राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम शाखा करणार समान नागरी कायद्याचा प्रसार

भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी शतकानुशतके मुस्लिमांना समान नागरी कायद्याच्या भीतीत ठेवले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम शाखा करणार समान नागरी कायद्याचा प्रसार

केंद्र सरकारने समान नागरी कायदा आणण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम शाखेनेही या कायद्याच्या जनजागृतीसाठी तयारी केली आहे. ‘अनेक देश समान नागरी कायद्याचे पालन करतात, ज्यात अनेक इस्लामिक देशांचाही समावेश आहे,’ असा युक्तिवाद मंचाचे मुख्य संरक्षक इंद्रेश कुमार यांनी केला आहे.  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे मुस्लिम समुदायात समान नागरी कायद्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. अनेक इस्लामिक देशांसह अन्य देशांमध्ये समान नागरी कायदा आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी आणि इतर देशांमध्येही समान नागरी कायदा आहे. या देशांमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांना त्यावर कोणताही आक्षेप नाही. मग भारतातच मुस्लिमांना त्याबद्दल शंका का वाटते?,’ असा प्रश्न मंचाचे मुख्य संरक्षक इंद्रेश कुमार यांनी उपस्थित केला.  

‘परदेशांतील मुस्लिम तिथल्या कायद्याचे पालन करतात. परंतु केवळ भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी शतकानुशतके मुस्लिमांना समान नागरी कायद्याच्या भीतीत ठेवले. हीच भीती दूर करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एक जनजागृती मोहीम चालवली जाईल,’ अशी माहिती त्यांनी दिली. ‘देशात अनेक धर्म आहेत आणि त्या सर्वांचा समान नागरी कायद्याद्वारे आदर केला जाईल,’ असे ते म्हणाले. भारताच्या २२व्या कायदा आयोगाने काढलेल्या नवीन अधिसूचनेत समान नागरी कायद्याची प्रासंगिकता आणि महत्त्व लक्षात घेऊन तसेच त्यासंबंधीचे न्यायालयाचे आदेश जाणून या विषयावर पुन्हा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘डाकू हसिना’ला आवरला नाही १० रुपयांच्या फ्रुटीचा मोह अन्…

अमेरिकेच्या व्हॉट्सऍप निर्बंधांमुळे तालिबानी सरकार चालवणे बनले मुश्किल!

मनीषा कायंदेंनी दाखवले सुषमा अंधारेंकडे बोट?

‘या’ सीनमुळे काठमांडूमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी!

राष्ट्रीय मीडिया अल्पसंख्याक मोर्चाचे प्रभारी यासिर जिलानी यांनीही समान नागरी कायद्याचे समर्थन केले. ‘भारतातील २५ कोटी मुस्लिमांपैकी तीन टक्केही पदवीधर नाहीत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही ते सर्वांत मागास का आहेत, हे मुस्लिमांनी समजून घेतले पाहिजे. असंख्य धर्म असणाऱ्या देशातील समान नागरी कायदा केवळ मुस्लिमांसाठीच कसा धोकादायक ठरू शकतो?’, असा सवालही त्यांनी केला. ‘हा कायदा कोणत्याही जाती, धर्म आणि समुदायाच्या विरोधात नाही, परंतु सर्व धर्मांचा आदर आणि संरक्षण करतो आणि सर्वांमध्ये बंधुभावासाठी कार्य करतो. जे या राष्ट्रवादी कायद्याचा विरोध करतात त्यांना खरेतर धर्मांमध्ये एकता नको आहे,’ असा आरोप त्यांनी केला. 

समान नागरी संहितेमध्ये धर्माचा विचार न करता सर्व नागरिकांसाठी विवाह, घटस्फोट, दत्तक, वारसा आणि उत्तराधिकार यासारख्या वैयक्तिक बाबींसाठी समान कायदा लागू होतो. सध्या देशात सर्व नागरिकांसाठी समान कायदा लागू नाही. वेगवेगळय़ा धर्मातील लोकांसाठी त्यांच्या धर्मानुसार वैयक्तिक कायदे लागू होतात. हिंदूंसाठी हिंदू कोड बिल लागू होते. समान नागरी कायदा अस्तित्वात आल्यास वेगवेगळे वैयक्तिक कायदे रद्द होतील.

Exit mobile version