सरसंघचालक मोहन भागवत यांचे उद्गार
देशात कोरोनाची लाट येण्यापूर्वी दिल्लीच्या शाहीन बागमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात मोठे आंदोलन सुरू होते. कोरोनाची लाट सुरू झाली आणि हे आंदोलन आणि त्यापाठोपाठ सीएए-एनआरसीचा मुद्दा देखील मागे पडला. मात्र, आता पुन्हा एकदा त्या मुद्द्यावरून नवी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सीएएविषयी एका कार्यक्रमात बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली असून देशातील मुस्लिमांचं सीएए अर्थात नागरिकत्व कायद्यामुळे कोणतंही नुकसान होणार नसल्याचं ते म्हणाले आहेत. याच विषयावरील एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी गुवाहाटीमध्ये मोहन भागवत बोलत होते.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी सीएए आणि एनआरसीसंदर्भात सुरू असलेला वाद राजकीय फायद्यापोटी घातला जात असल्याचं यावेळी बोलताना म्हटलं आहे. “सीएए (Citizenship Amendment Act) आणि एनआरसी (National Register of Citizens) दोन्ही कायद्यांचा हिंदू-मुस्लिमंमध्ये फूट पडण्याशी काहीही संबंध नाही. त्याभोवती अशा गोष्टींची होणारी चर्चा ही जाणीवपूर्वक राजकीय फायद्यासाठी केली जात आहे”, असं ते म्हणाले. “सीएएमुळे मुस्लिमांचं कोणतंही नुकसान होणार नाही”, असं देखील त्यांनी नमूद केलं.
हे ही वाचा:
चिपळुणात पूरपरिस्थिती, कोकणात हाहाकार
टाळेबंदीचा झाला धारावीला ‘दुप्पट’ फायदा; बैठ्या घरांवर चढले दोन मजले
चीनमध्ये १०० वर्षातला सर्वाधिक पाऊस, लाखो लोकांना केलं स्थलांतरित
मालपेकर यांची सोनसाखळी हिसकावणारा अटकेत
दरम्यान, यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी सीएएमुळे देशातील अल्पसंख्याकांना संरक्षण मिळेल, असं देखील नमूद केलं आहे. “स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, देशातील अल्पसंख्याकांची काळजी घेतली जाईल. ते अजूनही केलं जात आहे. आपण यापुढेही ते करतच राहू. यासंदर्भात आपण इतर देशांमध्ये असलेल्या बहुसंख्यकांशी देखील चर्चा केली. यापैकी कुणाला जर धोका किंवा भीतीमुळे भारतात यायची इच्छा असेल, तर आपण नक्कीच त्यांना मदत करायला हवी”, असं देखील भागवत म्हणाले.
एनआरसीविषयी बोलताना मोहन भागवत यांनी त्याचं समर्थन केलं आहे. “सर्वच देशांना आपले नागरीक कोण आहेत, हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. यामध्ये सरकार सहभागी असल्यामुळे हे प्रकरण राजकीय व्यासपीठावर गेलं आहे. सीएए आणि एनआरसी या दोन्ही मुद्द्यांभोवती सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या गोष्टी पसरवून त्यातून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत”, असं मोहन भागवत म्हणाले आहेत.