राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली आहे. मिथुन यांच्या मुंबई येथील राहत्या घरी सरसंघचालक भेटीला गेली असून, ही भेट अनौपचारिक असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही एकीकडे बंगाल निवडणूका तोंडावर आलेल्या असतानाच ही भेट झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
सरसंघचालक मोहन भागवत हे सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त मुंबई येथे उपस्थित होते. त्यानंतर आज म्हणजेच मंगळवार दिनांक १६ रोजी ते सकाळी मिथुन यांच्या निवासस्थानी नाष्त्यासाठी जाताना आढळून आले. तब्बल दोन तासांच्या या भेटीत सरसंघचालक आणि चक्रवर्ती कुटुंबीय यांच्यात अनौपचारिक गप्पा झाल्याचे समजते. पण या भेटीमुळे देशाच्या राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. बंगालच्या निवडणूक जवळ आलेल्या असून भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्या अनुषंगाने या भेटीला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. मिथुन चक्रवर्ती तृणमूल काँग्रेस कडून राज्यसभेचे खासदार राहिले आहेत पण २०१६ साली त्यांनी राजीनामा दिला होता.
हे ही वाचा:
“लोकशाही हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विचार” :- देवेंद्र फडणवीस
या भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही – मिथुन
सरसंघचालक यांच्या भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही असा खुलासा अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी केला आहे. सरसंघचालक आणि माझे अध्यात्मिक नाते आहे असे मिथुन यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी मिथुन हे नागपूर येथील संघ मुख्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी सरसंघचालकांना आपल्या निवासस्थानी भेट देण्याचे आमंत्रण दिले होते. त्याचाच मान ठेवत सरसंघचालक मोहन भागवत घरी आल्याचे मिथुन यांनी सांगितले. या भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही असे जरी मिथुन म्हणाले असले तरीही त्यांनी आपली गरिबांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली आहे.