१ मार्च पासून रिक्षा आणि टॅक्सीची दरवाढ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. वरकरणी हा निर्णय पेट्रोल दरवाढीमुळे घेण्यात आल्याचे भासत असले तरीही या दरवाढीबद्दल ठाकरे सरकारचे आधीच ठरले होते. गेल्याच विधिमंडळ अधिवेशनात ठाकरे सरकारने खटूआ समितीचा अहवाल स्वीकारत असल्याचे आणि यामुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे मान्य केले होते. महाराष्ट्रात एकीकडे कोरोनामुळे परिस्थिती बिकट असतानाच ठाकरे सरकारने भाडेवाढीचा निर्णय घेऊन जनतेचा कडेलोट केला आहे.
मंगळवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. १ मार्च पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या भाडेवाढीमुळे रिक्षेचे भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये, तर टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये होणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या निर्णयामागे पेट्रोल दरवाढीचे कारण दिले आहे पण भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी परब यांचा पर्दाफाश केला आहे.
हे ही वाचा:
….ही तर ठरवून केलेली भाववाढ- आ. अतुल भातखळकर
रिक्षा व टॅक्सी च्या भाड्यात तब्बल ३ रुपयांची भाडेवाढ करून अगोदरच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सामान्य मुंबईकरांना अधिकचा आर्थिक बोजा देण्याचे काम ठाकरे सरकार करीत असून कोणतेही कारण नसताना खटूआ समितीचा अहवाल स्वीकारून सामान्य मुंबईकरांना आर्थिक त्रास देण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याची टीका मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
भाजपा आमदार भातखळकर आणि परिवहन मंत्री अनिल परब खटूआ समितीच्या मुद्द्यावरून आमने-सामने आले होते. त्यावेळी अनिल परब यांनी स्वतः खटूआ समितीच्या अहवालामुळे भाडेवाढ होणार असल्याचे कबूल केले होते. त्याच विधीमंडळ चर्चेचा हा व्हिडीओ.