तेलंगणमध्ये काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे तेलंगणचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन रेवंथ रेड्डी हे तेलंगण विधीमंडळात काँग्रेसचे प्रमुख असतील, असे जाहीर केले.
‘रेवंथ रेड्डी हे अनुभवी आहेत. त्यांनी सर्वांसोबत काम केले आहे. तसेच, तेलंगणच्या विकासाच्या हमी त्यांनी तेलंगणच्या नागरिकांना दिली आहे,’ असे वेणुगोपाल यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा गुरुवार, ७ डिसेंबर रोजी होणार आहे.
रेवंथ रेड्डी यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल काँग्रेसच्या नेतृत्वाचे आभार मानले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी वेणुगोपाल, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि तेलंगणचे प्रभारी सरचिटणीस माणिकराव आणि सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
वरिष्ठ काँग्रेस नेते उत्तम कुमार रेड्डी आणि भट्टी विक्रमार्का यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडू शकते किंवा एखादे चांगले खाते दिले जाऊ शकते. कदाचित, मुख्यमंत्रिपद हे फिरतेही असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हे ही वाचा:
विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या १२ पैकी १० खासदारांनी लोकसभेचा दिला राजीनामा!
‘गेले ३० तास माझ्या भागात वीज नाही’
लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख अदनान अहमदची कराचीमध्ये हत्या!
मुंबईतून ८ तोतया आयकर विभाग अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
तेलंगणवासींमध्ये लोकप्रिय
मल्काजगिरी मतदारसंघाचे खासदार असणारे रेवंथ रेड्डी हे तेलंगण राजकारणातले महत्त्वाचे नेते आहेत. तेलुगु देसम पक्ष ते सन २०१७मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश असा त्यांचा प्रवास राहिला आहे. दोनवेळा आमदार राहिलेले रेड्डी हे तेलंगण काँग्रेसचा महत्त्वाचा चेहरा आहेत. रेड्डी यांचा आक्रमक प्रचार आणि मुख्यमंत्री केसीआर यांना तगडे आव्हान देणारा नेता या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांची जनमानसात लोकप्रियता आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात होते. रेड्डी यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला तसेच, अनेक मोर्चे काढून बीआरएस सरकारला वेळोवेळी आव्हान दिले. त्यामुळे त्यांची लोकप्रियता राज्यात वाढली आहे.