खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा संबंध भारत सरकारशी जोडल्याने कॅनडा आणि भारतामधील संबंध ताणले गेले आहेत. त्यानंतर कॅनडातील नागरिकांना भारताकडून व्हिसा देणे बंद करण्यात आले होते. आता मात्र भारताने निवडक गटांतील कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी याबाबत ‘एक्स’ या सोशल मीडिया व्यासपीठावर या संदर्भातील माहिती जाहीर केली आहे. ‘सुरक्षास्थितीची विस्तृत तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे की, २६ ऑक्टोबर, २०२३पासून निवडक गटांसाठी व्हिसाची सेवा पुन्हा सुरू केली जाईल. ज्यात प्रवेश व्हिसा, व्यापारी व्हिसा, वैद्यकीय व्हिसा आणि कॉन्फरन्स व्हिसाचा समावेश आहे,’ असे त्यांनी जाहीर केले आहे.
नुकतेच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताकडून कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्यास सुरुवात केली जाईल, असे संकेत दिले होते. जर भारताला कॅनडामधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत काही प्रगती आढळल्यास कॅनडामधील नागरिकांना भारताकडून लवकरच व्हिसा सेवा सुरू केली जाईल. कॅनडामधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत काळजी असल्यामुळे भारताने काही आठवड्यांसाठी कॅनडातील नागरिकांना भारताचा व्हिसा देण्याची प्रक्रिया स्थगित केली होती. कॅनडातील राजनैतिक अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात कसूर ठेवणे हा आंतरराष्ट्रीय व्हिएन्ना कायद्याचा भंग आहे, असे परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले होते.
हे ही वाचा:
कंगना रनौत अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला
पोलीस कर्मचाऱ्याकडून ७ हजाराची लाच मागणारा सरकारी वकील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!
शहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबियांना शिंदे सरकारकडून मदत जाहीर
वकील सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणी तिघांना अटक
दोन्ही देशांतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने २१ सप्टेंबरपासून कॅनडामधील नागरिकांना व्हिसा देणे स्थगित केले होते. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची आपापल्या देशातून हकालपट्टी केली होती.