राज्यात महाविकास आघाडीने जागा वाटपांच्या चर्चांना पूर्णविराम लावला असला तरीही काही जागांवरून अंतर्गत कलह सुरू असल्याची बाब समोर येत आहे. भिवंडी, सांगली आणि मुंबईतील काही जागांवर वाद असल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या जागेवरून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्याने काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी फेरविचार करण्याचा सल्ला महाविकास आघाडीला दिला होता. दरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मविआमधून विशाल पाटील यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाने या जागेवर दावा सांगितला असून काँग्रेसची या जागेवर ताकद असल्याचे म्हणणे आहे. अशातच आता महाविकास आघाडीपुढी अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून म्हणजेच शुक्रवार, १२ एप्रिल रोजी बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्व तालुक्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आक्रमक भूमिका काँग्रेस पदाधिकारी घेण्याची चिन्हे आहेत.
हे ही वाचा..
कुराण जाळणारा इराकचा सलवान मोमिक जिवंत!
पाकिस्तानमध्ये गुन्हेगारीच्या प्रकरणामध्ये लक्षणीय वाढ !
गाय मारल्याप्रकरणी मीरा रोडमधून नईम कुरेशीला अटक
विमाने खरेदी करण्यासाठी ६५ हजार कोटींची निविदा
गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली लोकसभेसाठी काँग्रेसच्या गोटातून तयारी करत असलेल्या विशाल पाटील यांना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीने झटका बसला आहे. ही जागा काँग्रेसच्या पदरात पडावी यासाठी वारंवार दिल्ली दौरे सुरू होते मात्र तरीही ही जागा ठाकरे गटाकडे गेली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीसमोरच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.