अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षातील उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा अखेर मुंबई महानगरपालिकेने मंजूर केला आहे. आज सकाळी ११ वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं महानगर पालिकेला दिले होते. पालिकेने राजीनामा स्वीकारल्यामुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पोट निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच त्यांना आपला उमेदवारी अर्ज देखील भरता येणार आहे.
ऋतुजा लटके यांनी नोकरीचा राजीनामा एक महिन्यापूर्वी दिला होता. तेव्हापासून त्या नोकरीवरही हजर नव्हत्या. तरी देखील त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, ऋतुजा लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आल्याने त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आला नाही, असे महापालिकेच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते. मात्र, न्यायालयाने त्यांचा राजीनामा मंजूर करणार आहात का, ते स्पष्ट करा असे सांगत न्यायालयाने पालिका प्रशासनाला सुनावले होते. तसेच त्यांचा राजीनामा शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत स्वीकारवा आणि तसे पत्र द्यावे, असे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने आज सकाळीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
हे ही वाचा:
राणा आयुबचे ईडीने १ कोटी ७७ लाख रुपये गोठवले
आमिरवर जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात बॅनर झळकले
काश्मीर मुद्द्यावर टिपण्णी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने फटकारले
आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली होती. निवडणूक आयोगाने या जागेवरील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. नियमानुसार ऋतुजा लटके यांनीही निवडणुकीत उतरण्यासाठी महापालिकेतील नोकरीचा राजीनामा दिला. मात्र, महापालिकेने हा राजीनामा मंजूर केला नाही.