‘नवाब मलिकांची हकालपट्टी करा’

‘नवाब मलिकांची हकालपट्टी करा’

भाजपा नेते भातखळकरांची राज्यपालांकडे कारवाईची मागणी

खोट्या आणि बिनबुडाच्या आरोपांची राळ उडविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. भातखळकर यांनी सकाळी दिंडोशी पोलिस ठाण्यात मलिक यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली आहे. मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा, अशीही मागणी त्यांनी पोलिसांना केलेल्या तक्रारीत केली आहे. जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा मार्ग आमच्यासाठी मोकळा असेल, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर, प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार तमिळसेल्वन यांच्या शिष्टमंडळाने संध्याकाळी राजभवनला भेट देत राज्यपालांकडे तक्रार केली. राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात मलिक यांचा खोटारडेपणा आमदार भातखळकर यांनी उघड केला आहे. आ. भातखळकर यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, मलिकांनी केंद्र सरकारविरोधात अफवा पसरविण्याचे काम केले आहे. राज्यात रेमडेसिवीर हे इंजेक्शन विकू नये यासाठी केंद्राने कंपन्यांवर दबाव आणल्याचे खोटे आरोप मलिक यांनी केले. त्यामुळे केंद्राबद्दल जनसामान्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण त्यांनी तयार केले. लोकांमध्ये भीती निर्माण केली. मलिक यांना हे आरोप सिद्ध करण्याचे आव्हान आम्ही दिले, पण त्यांच्याकडून अद्याप एकही पुरावा आलेला नाही.
भाजपा नेते भातखळकर यांनी त्याआधी दिंडोशी पोलिस ठाण्यात मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली. जर पोलिसांनी मलिक यांच्यावर कारवाई केली नाही, तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ असेही भातखळकर म्हणाले. हा दखलपात्र गुन्हा असल्यामुळे पोलिसांनी कलम १५४ अंतर्गत तक्रार नोंदवून घेत मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणीही भातखळकर यांनी पोलिसांना लिहिलेल्या तक्रारीत केली आहे.

Exit mobile version