केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात जेनेटिक लाईफ सायन्स फार्मसी कंपनीत रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन सुरु झालंय. स्वतः नितीन गडकरी यांनी आज (६ मे) कंपनीत जाऊन उत्पादनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी यापुढे रेमडेसिवीरविना कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होणार नसल्याचं मत व्यक्त केलं. तसेच रेमडेसिवीरचा काळा बाजार बंद होऊन रुग्णांना सरकारी दरात रेमडेसिवीर इंजक्शन उपलब्ध होईल, असंही नमूद केलं. ते वर्धा येथे बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले, “रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होता. त्यामुळेच त्याचा काळा बाजार झाला. अनेक लोकांना रेमेडेसिवीर न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला. म्हणूनच आम्ही रेमडेसिवीरचं उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, रेमडेसिवीरचं पेटंट असल्याने तसं करणं कठीण होतं. आम्ही उत्पादनाचे अधिकार मिळण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला यश मिळालं.”
“आता नागरिकांना सरकारी दरात रेमडेसिवीरचा पुरवठा केला जाईल. त्यामुळे आता त्याचा काळा बाजारही होणार नाही. तसेच रेमडेसिवीरविना कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होणार नाही. रेमडेसिवीरवर कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही. उत्पादन अधिक झाल्यानंतर इतर राज्यांना देखील पुरवलं जाईल,” असं नितीन गडकरी यांनी नमूद केलं.
दरम्यान काही दिवसापूर्वी राज्यातील रेमडेसिव्हीरचा तुटवडा जाणवत होता. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी जेनेटिक सायन्स लॅबला रेमडेसिव्हीर उत्पादन करण्याची परवानगी मिळवून दिली. नितीन गडकरींच्या पाठपुराव्याने या ठिकाणी रेमडेसिव्हीरचे उत्पादन करण्यात येणार आहे. तसेच जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये ३० हजार बनवण्याचा लक्ष्य आहे. हैदराबाद येथील हेट्रा कंपनीकडून सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफसायन्सला उसणवार तत्वावर निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे.
हे ही वाचा:
संगमनेरमध्ये जमावाकडून पोलिसांवर हल्ला
‘मुंबई पोलिस रश्मी शुक्लांना अटक करू शकत नाहीत’
महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले होते . कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन पाठवण्यात मिळाली होती.