दिल्लीमध्ये मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार स्थापन झाले असून आता विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यावरून आता विद्यमान मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी पहिल्या मंत्रिमंडळात महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याची योजना मंजूर करण्याच्या आश्वासनाची सरकारला आठवण करून दिली. यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आतिशी यांच्यावर पलटवार करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आतिशी यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी म्हटले की, नव्या सरकारला व्याख्याने देऊ नका आणि स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या. पुढे त्या म्हणाल्या की, हे आमचे सरकार आहे. अजेंडा आमचा असेल. आम्हाला काम करू द्या. त्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही; सत्तेत असताना त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले आहे. रेखा गुप्ता म्हणाल्या की, जनतेला जी काही आश्वासने दिली गेली आहेत, ती सर्व आश्वासने पूर्ण केली जातील.
“काँग्रेसने १५ वर्षे राज्य केले आणि ‘आप’ने १३ वर्षे राज्य केले. त्यांनी काय केले ते पाहण्याऐवजी, ते आमच्या एका दिवसाच्या कारभारावर प्रश्न कसे उपस्थित करू शकतात? हे तेच लोक आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे राज्य केले आणि त्यांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यांना भीती आहे की जेव्हा कॅग अहवाल मांडला जाईल तेव्हा अनेक लोकांची गुपिते उघड होतील,” अशी टीका रेखा गुप्ता यांनी केली आहे.
हे ही वाचा :
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर वादग्रस्त लिखाण; लेखकांवर दाखल होणार गुन्हा
सिनेटने मंजुरी दिलेले FBI चे भारतीय वंशाचे संचालक काश पटेल कोण आहेत?
एकनाथ शिंदेंच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या दोघांना बुलढाण्यातून अटक
इस्रायलमध्ये बस स्फोटांची मालिका; दोन बसमध्ये आढळली स्फोटके
आतिशी यांनी म्हटले आहे की, पहिल्याच दिवशी भाजपाने वचन मोडण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने दिल्लीतील लोकांना फसवण्याचे ठरवले आहे. एका महिला मुख्यमंत्र्यांनी पदावर आल्याच्या पहिल्याच दिवशी महिलांना दिलेले वचन मोडले हे दुःखद आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्टर देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये महिलांना एका फलकासह दाखवले आहे आणि लिहिले आहे की दिल्लीच्या महिला २५०० रुपयांच्या मासिक भत्त्याची वाट पाहत आहेत.