केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी झालेल्या अटकेवरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. नारायण राणे यांना करण्यात आलेली अटक ही सूडबुद्धीने केलेली असल्याचा आरोप सुरवातीपासूनच भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत होता. तर ही अटक करताना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी पूर्ण केली नाही असे म्हटले जात होते. पण सध्या या अटक प्रकरणावरून शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मंगळवारी अनिल परब यांचा एक व्हिडीओ मीडिया आणि सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. नारायण राणे जेव्हा संगमेश्वर येथे होते तेव्हा रत्नागिरी पोलीस त्यांना अटक करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले. या वेळी पोलिसांकडे अटक वॉरंट मागण्यात आला. पण पोलिसांकडे अशाप्रकारचा कोणताही वॉरंट नव्हता. त्याचवेळी बहुदा पोलिसांनी अनिल परब यांना फोन केला असावा. कारण त्या पद्धतीच्या संभाषणाचा अनिल परब यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा:
नारायण राणे यांचं काही चुकलं नाही
मुख्यमंत्री इतक्या कोत्या मनाचा, सूडबुद्धी असू शकत नाही
महाविकास आघाडीचे थोबाड फुटले…नारायण राणेंना जामीन मंजूर
या व्हिडीओ मध्ये अनिल परब हे फोन वरून बोलताना दिसत आहेत. ‘काय करताय तुम्ही लोकं? घेताय की नाही ताब्यात? तुम्हा लोकांना करावं लागेल ते! कसली ऑर्डर मागतायंत ते? हाय कोर्ट आणि सेशन्स कोर्टाने जामीन नाकारला आहे. तुम्ही थोडी पोलिस फोर्स वापरून ताब्यात घ्या!’ असे म्हणताना परब दिसत आहेत. यावरूनच भाजपा आक्रमक झालीय असून अनिल परब हे पोलीस खात्यावर दबाव आणत असल्याचे म्हटले जात आहे.
भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर ह्यांनी या प्रकरणात अनिल परब यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. अनिल परब हे प्रशासकीय कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ संदेश प्रसारित करत भातखळकर यांनी या तक्रारी विषयी माहिती दिली आहे.
काय म्हणाले भातखळकर?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अन्यायकारक अटक प्रकरणी रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर अनिल परब यांनी जाहीरपणे रत्नागिरीच्या एसपीला फोन करून दबाव आणला. अर्णेश कुमार निकालानुसार जी प्रोसिजर फॉलो केली पाहिजे ती फॉलो केली नाही. कायद्याचा गैरवापर केला, मंत्री पदाचा गैरवापर केला. प्रशासकीय कामकाजात परब यांनी मंत्री असताना हस्तक्षेप केला त्याच्यात अडथळा आणला.
त्यामुळे अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडे भातखळकर यांनी केली आहे. ई-मेल द्वारे पत्र पाठवून ही तक्रार करण्यात आली आहे. येत्या २४ तासात या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला नाही तर आपण न्यायालय सुद्धा दाद मागू असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे. तर पोलिसांसाठी असलेल्या न्यायिक प्राधिकरणातही दाद मागू असा पवित्रा भातखळकर यांनी घेतला आहे.
मंत्रिपदाचा गैरवापर करून रत्नागिरीच्या एसपीवर दबाव आणला, न्याय प्रशासकीय व्यवस्थेत ढवळाढवळ केली, याची दखल घेऊन परिवहन मंत्री @advanilparab यांच्यावर तात्काळ FIR दाखल करावा अशी माझी मागणी आहे. pic.twitter.com/z2jtW7Mcfu
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 25, 2021
अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. परब यांच्या अशा व्हिडीओने चांगलीच खळबळ उडाली. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील परब यांच्या विरोधात भाजपा कोर्टात जाणार असल्याचे सांगितले होते.