पंढरपूर- मंगळवेढा मतरदारसंघात होऊ घातलेल्या पोट निवडणुकीसाठी भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आज विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी सरकारवर टिका केली.
यावेळी त्यांनी सरकारचा भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार चव्हाट्यावर आणून आपली नापसंती व्यक्त करण्याची संधी असल्याचे देखील सांगितले. महाराष्ट्रात महावसूली आघाडी सरकार असल्याची घणाघाती टिका देखील त्यांनी केली. कोरोना बाबत सरकारवर ताशेरे ओढून, इथे फक्त ‘लॉक’शाही आहे त्यामुळे सतत फक्त लॉकडाऊनचा विचार केला जातो असेही ते म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात जनतेला रोजगार गेल्यामुळे नुकसान भरून काढायला मदतही दिली जात नाही असेही त्यांनी सांगितले. त्याबरोबरच या काळात शेतकऱ्यांकडून मुघलांच्या काळातील जिझिया कराच्या वसूलीप्रमाणे वीजबीलाची वसूली केली जात असल्याची टिका देखील त्यांनी केली.
हे ही वाचा:
भाजपा आमदार पास्कल धानेरे यांचे कोरोनामुळे निधन
६३,२९४ नव्या रुग्णांसह महाराष्ट्राने नोंदवला रुग्णवाढीचा नवा उच्चांक
कोवीड लसीच्या साठेबाजी प्रकरणी राजेश टोपेंना नोटीस
आत्ता निवडणुकीमुळे पंढरपूर मतदार संघातील विज कापली नाही. मतदानानंतर पुन्हा कापतील आणि ते नाही केलं तर माझं नाव बदला असं आव्हानही त्यांनी दिलं. बिल्डरांना सूट देऊन शेतकऱ्यांकडून पाच हजार कोटी रुपयांची वसूली केल्याची टिका देखील त्यांनी यावेळी सरकारवर केली. या जिल्ह्याच्या विकासाला भाजपा सरकारने जास्त पैसे दिले असेही त्यांनी यावेळी सांगितले.
समाधान आवताडे हे संघर्षशील नेतृत्व आहे. लोकप्रतिधीनी संघर्ष करणारा, प्रश्न मांडणारा, भांडणारा असायला हवा, असे त्यांनी यावेळी सांगितले. या ऊसाच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांना इथॅनॉलमुळे कारखाने अडचणीतून बाहेर येतील आणि ऊसाला भाव मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.