कोरेगाव भीमा प्रकरणातील पवारांच्या उत्तराबद्दल आश्चर्य
कोरेगाव भीमा दंगलप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शरद पवार यांची साक्ष झाली पण त्यात शरद पवार यांनी या प्रकरणातून आपले हात झटकले. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना आपण ओळखत नाही, अशी साक्ष पवारांनी यासंदर्भात राज्य सरकारने स्थापन केलेल्या दोन सदस्यीय आयोगासमोर दिली. शिवाय, १२४ या कलमाचा उपयोग इंग्रजांच्या काळात होत होता, ते आता रद्द केले पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी घेतली. योगायोगाने गुरुवारीच १२४ कलमाच्या आधारे राजद्रोहाचा आरोप असलेल्या राणा दांपत्याला जामिन मिळाल्याने त्यांची सुटका झाली. त्यामुळे पवारांच्या या भूमिकांबद्दल आश्चर्य प्रकट केले गेले.
उलट शरद पवार यांनी या साऱ्या प्रकरणाता तत्कालिन सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखली नाही आणि त्यामुळे दंगल उफाळली. ते दंगल आटोक्यात आणण्यास अपयशी ठरले, असे पवार साक्ष देताना म्हणाले.
हे ही वाचा:
‘मशिदींवर भोंगे लावणे हा मूलभूत अधिकार नाही’
‘राणा दाम्पत्याचा जेलमधला अनुभव ऐकून इंग्रजांच्या जेलची आठवण’
उष्णतेचा कहर! जवानांनी वाळूत भाजले पापड
१२ दिवसांनी राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर, नवनीत राणा रुग्णालयात दाखल
१ जानेवारी २०१८ मध्ये हे कोरेगाव भीमा दंगल प्रकरण घडले होते. तेथे असलेल्या विजयस्तंभाचे दर्शन घेण्यासाठी लोक आलेले असताना ही दंगल घडली. त्यात तेव्हा आयोजित केलेल्या एल्गार परिषदेचाही हात असल्याचा आरोप झाला होता. त्यातही एल्गार परिषदेतील अनेकांना अटक करण्यात आली होती.
याप्रकरणात ज्यांच्यावर आरोप होते, ते संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना आपण ओळखता का असा सवाल वकिलांनी विचारल्यावर आपण त्यांना ओळखत नसल्याचे पवार म्हणाले. आपण त्यांच्यासंदर्भात पेपरमध्ये वाचले आहे, असे पवार म्हणाले. येथे झालेल्या हिंसाचाराबद्दल आपल्याला केव्हा कळले असे विचारल्यावर दुसऱ्या दिवशी मीडियात आलेल्या बातम्यांवरून आपल्याला ही माहिती मिळाल्याचे पवार म्हणाले.