रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून पाच तास चौकशी

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या कथित गैरव्यवहाराच्या तक्रारीवरून चौकशी

रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून पाच तास चौकशी

भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या कथित गैरव्यवहाराच्या तक्रारीवरून शनिवारी उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे शाखेने सुमारे पाच तास चौकशी केली. चौकशीनंतर हे आरोप खोटे असल्याचे आमदार रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे.

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील क्रीडांगण आणि उद्यानाच्या जागेवर अनधिकृत ताबा घेऊन ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी तक्रारीत केला होता. याबद्दल आझाद मैदान पोलिसांकडे सोमय्या यांनी तक्रार केली होती. त्यानंतर ही तक्रार आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आली होती. आमदार वायकर यांनी ट्रस्टच्या नावाने गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांचा आहे.

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील खुले क्रीडांगण आणि उद्यानासाठी असलेल्या जागेवर वायकर यांनी अनधिकृत ताबा घेतला आहे. तेथे त्यांनी दोन लाख चौरस फुटांचे पंचतारांकित हॉटेल बांधण्यास सुरुवात केली आहे. जोगेश्वरी– विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या जमिनीवर हे बांधकाम सुरू आहे. या हॉटेलची किंमत ५०० कोटी रुपये इतकी होत असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला होता. वायकर यांनी ही जागा एका कंपनीकडून ताब्यात घेतली होती. बागेचे आरक्षण दाखवून चार कोटी रुपये रेडी रेकनर मूल्याचा भूखंड तीन लाख रुपयांना खरेदी केला. त्यानंतर या भूखंडावरील ३३ टक्के जागेवर वायकर यांनी बँक्वेट बांधले. गेली अनेक वर्षे या जागेवर लग्न, पार्टी असे अनधिकृत व्यवहार सुरू आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.

हे ही वाचा:

अतिक अहमद टोळीचा सदस्य इरफान हसन पोलिसांच्या ताब्यात

…जेव्हा पंतप्रधान मोदींची धाकटी बहीण मुख्यमंत्री योगींच्या मोठ्या बहिणीला भेटते!

भारतीय नौदलाकडून दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन

मणिपूरमध्ये जमावाने शस्त्रास्त्रे, दारूगोळा लुटला

या पार्श्वभूमीवर शनिवारी वायकर यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात हजेरी लावली. सकाळी साडेअकराच्या दरम्यान वायकर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात हजार झाले. तेव्हापासून सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. आपण नियमानुसार काम केले असल्याचे वायकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपल्याला यापूर्वीच चौकशीला बोलावले होते. मात्र विधानसभेचे अधिवेशन सुरु असल्याने आपण वेळ मागून घेतला होता. अधिवेशन संपल्यानंतर आपण चौकशीसाठी हजर झालो. यानंतरही आपल्याला बोलावले तर चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे वायकर म्हणाले.

Exit mobile version