हनुमानच शिवसेनेला धडा शिकवेल

हनुमानच शिवसेनेला धडा शिकवेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्धार करणारे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत कौर राणा यांनी आता माघार घेतली आहे. रविवार, २४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणा यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही माघार घेण्यात आली आहे.

राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार केला होता. तर शिवसेनेने त्यांना खुले आव्हान दिले असून त्यांना रोखण्यासाठी बंदोबस्त केला होता. आता मुंबईतील शिवसैनिक रात्रभर मातोश्री निवासस्थानाबाहेर आणि राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर डेरा टाकून बसले होते. शनिवार, २३ एप्रिल रोजी सकाळी राणा यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी तुफान राडा घातला. राणा दाम्पत्याला यावेळी शिवसैनिकांनी धमकावले. तर दुसरीकडे मातोश्री निवासस्थानाबाहेर देखील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमा होत राणा दाम्पत्य विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात आली.

असे असले तरीही दाम्पत्याचा मातोश्रीवर जाण्याचा निर्धार कायम होता. पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातच पडून ठेवल्यामुळे ते मातोश्रीवर जाऊ शकले नाही पण रविवार देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाणे रद्द केले आहे. नरेंद्र मोदी हे देशाचा गौरव असून त्यांनी महाराष्ट्राला आणि मुंबईला मार्गदर्शन केले पाहिजे म्हणून आपण माघार घेत असल्याचे राणा यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’

‘राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले’

‘मातोश्री मंदिर आहे तर, आम्हाला का रोखले जात आहे’

दिल्ली पोलीस आयुक्तांनी त्या आरोपींना तीन तास शेकवून काढले

आपला हा निर्णय जाहीर करताना त्यांनी राज्यातील सत्ताधारी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था बिघडवत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा रद्द व्हावा असा काही लोकांचा विचार आहे. पण तसे होऊ नये म्हणून मी माझे आंदोलन मागे घेत आहे असे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे. तर हनुमानच शिवसेनेला धडा शिकवेल असा घणाघात राणा यांनी केला आहे.

आपल्या घरावर झालेला हल्ला हा शरद पवार यांच्या सिल्वर ओक या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रमाणेच आहे असा आरोप राणा यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांवर ज्या कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले तेच गुन्हे आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल केले जावेत अशी मागणी राणा यांनी केली आहे.

तर महाराष्ट्र हा बंगालच्या वाटेने चालला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच आमच्यावर हल्ला करण्याचे आदेश दिले असावेत असे वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा म्हणावी एवढीच आमची अपेक्षा होती. पण तसे घडले नाही. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून अडीच वर्षे महात्राष्ट्रावर संकटे आहेत असे राणा यांनी म्हटले.

Exit mobile version