राज्यात सध्या हनुमान चालीसा वाचन प्रकरणावरून राजकारण रंगल्याचे चित्र आहे. दरम्यान आमदार रवी आणि खासदार नवनीत राणा हे आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मातोश्री’वर जाऊन हनुमान चालीसा वाचणार यावर आपली भूमिका ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. उद्या, २३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यावर आलेलं संकट दूर व्हावे म्हणून हनुमान चालीसा पठन करणार असल्याचे आमदार रवी राणा म्हणाले. हनुमान चालीसा वाचण्यासाठी म्हणून विरोध होत असेल तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हिंदुत्व विसरले आहेत, असा टोला रवी राणा यांनी लगावला आहे. हिंदुत्वाची दिशा सोडून महाराष्ट्राचे वाटोळ करत आहेत, अशी टीका रवी राणा यांनी केली आहे.
मुंबईत आपण गोंधळ करायला आलेलो नाही. शांततेत आणि पोलिसांना सहकार्य करत आपण हनुमान चालीसा वाचणार असल्याचे रवी राणा म्हणाले. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांनाही मुंबईत येण्यास मनाई केली आहे. निवडणुकांच्या वेळी हिंदुत्वाच्या नावाने मत मागतात. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी आमचं स्वागत केलं असत आणि हनुमान चालीसा शंभर वेळा वाचू दिली असती, असे रवी राणा म्हणतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो दाखवून मत मिळवली आहेत. मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसाच्या चार ओळी तरी सांगाव्यात, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालीसा वाचणार, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे. दोन- अडीच वर्षांनी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात पाऊल ठेवले आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडलाय की महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहेत की नाही? अशी टीका रवी राणा यांनी केली आहे.
हे ही वाचा:
अमित मिश्राची फिरकी, इरफान पठाण क्लीन बोल्ड
गुरु तेग बहादूर शौर्याचा आदर्श ठेवतात; प्रकाशपर्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश
CISF जवानांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; एका जवानाला वीरमरण
आजपासून उदगीरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
अडीच वर्षे मंत्रालयात मुख्यमंत्री जात नाहीत. पण आज महाराष्ट्रात वीज प्रश्न, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याची उत्तर त्यांनी जनतेला द्यावीत. राज्याचे मुख्यमंत्री हे बिनपगारी आहेत, अशी खोचक टीका नवनीत राणा यांनी केली आहे. नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत हे पोपट आहेत त्यांना शांत बसवण्यासाठी मिरची द्या, असा खोचक टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे.