आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदासाठीच्या चेहरा कोण यावरून खलबतं सुरू आहे. अद्याप महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा, अशी अप्रत्यक्ष मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली करण्यास सुरुवात केली असली तरी त्यांच्यात मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून एकमत होताना दिसत नसल्याची चर्चा आहे. “आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहुनही झालेलं आहे. अर्थातच तिघांचीही ताकद एकत्र होती. पण बिन चेहऱ्याचं सरकार, हे अजिबात चालणार नाही. लोक स्वीकारणार नाहीत. लोकांना चेहरा द्यावाच लागेल. उद्धव ठाकरेंकडे पाहून लोकांनी लोकसभेला मतदान केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावा लागेल, चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचे आहे,” असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
संजय राऊतांच्या विधानावर काँग्रेस आणि शरद पवार गटाने मात्र सावध भूमिका घेतली आहे. “आम्ही आज एकत्रित आहोत, एकत्र राहणार आहोत आणि महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मुख्यमंत्री कोण यावर आम्ही चर्चा करत नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर भाष्य करणं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टाळलं.
हे ही वाचा:
केजरीवालांना सीबीआय कोठडीत भगवद्गीता बाळगण्याची परवानगी
चांद्रयान- ४ चंद्रावर पोहचण्यापूर्वीच रचणार इतिहास; यानाचे भाग दोन प्रक्षेपणांद्वारे कक्षेत पाठवणार
अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत दक्षिण आफ्रिकेने मिळवले फायनलचे तिकीट
उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात सर्वाधिक पेपरफुटी!
दरम्यान, “मुख्यमंत्री कोण व्हावा याच्यात मविआच्या कुठल्याही नेत्याने स्वारस्य ठेवू नये. आम्ही सत्तेवर आले पाहिजे हे स्वारस्य ठेवले पाहिजे. मविआत निवडून आलेले आमदार कोण मुख्यमंत्री हे ठरवतील. महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षातील नेत्याने मुख्यमंत्री कोण होणार अशी भाषा करणे टाळले पाहिजे,” असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.