महाविकास आघाडी आता फक्त चवीपुरती उरलेली असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हळू हळू साइड ट्रॅकला जात असल्याचे चिंचवड पोट निवडणुकीत राहुल कलाटे यांच्या बंडखोरी वरून सिद्ध झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आता उद्धव विरोधी वारे व्हायला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आता अजित पवार यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत. परंतु राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र या प्रकरणात स्वत:च्या पक्षाबाबतच आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी भूमिका घेतली आहे. नाशिकमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी कोणाला काहीही आवडेल. मात्र आमच्याकडे शक्ती नाही, संख्या नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे म्हणत आपली हतबलता व्यक्त केली आहे. अजित पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री करण्याच्या चर्चेवर लगावला टोला म्हणजे सध्या तरी नमनालाच घड भर तेल अशी स्थिती असल्याचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसून येत आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरील नाराजीचे काळे ढग वाढत चालले आहेत. नाना पटोले – बाळासाहेब थोरात यांच्यातील नाराजी नाट्य असे सध्याचे वातावरण बघता महाविकास आघाडी फक्त कागदापुरती उरली असल्याची जाणीव आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना होऊ लागली आहे. त्यामुळेच आता मुख्यमंत्री पदाची वेगळी चूल मांडण्याची नवीन टूम समोर आली आहे. पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी तर अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे , त्यामुळे कामाला लागा असे आवाहन केले. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच आणि तेही अजितदादाच असे जाहीरपणे बोलून दाखवले.
हे ही वाचा:
महान दूरदर्शी व्यक्तिमत्व पंडित दिनदयाळ उपाध्याय
फक्त ५०० रुपये दिले नाहीत म्हणून केला खून
रोहित पवारांनी राहुल-राऊतांना खुळ्यात काढले?
उद्धव ठाकरेंच्या शब्दाला किंमत राहिली नाही का?
आमदार राजू नवघरे यांनी शेतकरी मेळाव्यात बोलताना हिंगोली जिल्ह्यातील शिरडशहापूरमध्ये आलेले मुख्यमंत्री कसे झाले याच्या आठवणी सांगितल्या . विलासराव देशमुख, देवेंद्र फडणवीस येथे येऊन गेल्यावर मुख्यमंत्री कसे झाले हे सांगितले. त्याचवेळी अजित पवार हेही २०२४ ला मुख्यमंत्री होतील असे भविष्य वर्तवले.
आमच्याकडे शक्ती नाही, तेवढी संख्याही नाही
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते , आमदार यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण शरद पवार यांनी मात्र याबाबत विपरीत विधान केले आहे. कोणाला काहीही आवडेल. पण तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना? जर आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडे शक्ती नाही, तेवढी संख्याही नाही. त्यामुळे यावर आता भाष्य करणे योग्य वाटत नाही. असे सांगत पवार यांनी या विषयावर जास्त बोलणे टाळले आहे.