रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी…कर्नाटकी कशिदा मी काढिला… असे गाणे मोठ्या आवाजात वाजवले जात होते. समस्त मंडळी तल्लीन झाली होती. या गाण्यावर वाघ्या मुरळीचे नृत्य सुरू होते. हे एखाद्या कार्यक्रमातील चित्र नव्हते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गॅस दरवाढीविरोधात केलेल्या आंदोलनाचे ‘संतप्त’ रूप होते.
पुण्याच्या स्वारगेट परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे आंदोलन आयोजित केले होते. गळ्यात राष्ट्रवादी पक्षाचे रंगीबेरंगी गमछे घातलेले कार्यकर्ते, गॅस सिलिंडर वगैरे सामुग्री, सिलिंडरवर हार असे सगळे वातावरण. मग रेशमाच्या रेघांनी हे गाणे वाजू लागले आणि त्या गाण्यावर वाघ्या मुरळीचे लोकनृत्य करणारे कलाकार थिरकू लागले. त्यात मग राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही रंगून गेले. राष्ट्रवादीच्या या आंदोलनाचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर आता सर्वसामान्य खिल्ली उडवताना दिसत आहेत.
एकीकडे गॅसदरवाढ विरोधात लोक किती संतप्त आहेत, असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारविरोधातील विविध पक्ष आंदोलनाच्या माध्यमातून करत आहेत. पण प्रत्यक्षात त्या आंदोलनाचे चित्र मात्र वेगळेच असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण होते आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या आंदोलनातही प्रसिद्धीपायी एका बैलगाडीवर मोठ्या संख्येने लोक उभे राहिले आणि गाडी कोसळली. त्यात जनावरालाही मार बसला होता. त्यावरूनही लोकांनी आंदोलनाची खिल्ली उडविली होती. बिहारमध्येही सपाच्या कार्यकर्त्यांनी असेच बैलगाडी आंदोलन घेतले, पण बैलानेच आंदोलनकर्त्यांवर हल्ला करत त्यांना सळो की पळो करून सोडले होते.
राष्ट्रवादीचे हे आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठीच केले होते का, त्यातून खरोखरच लोकांचे प्रश्न मांडण्याचा हेतू होता का, असाच सवाल आला लोक विचारत आहेत.