निवडणुकांत शिवसेनेला सोबत न घेण्याचा ‘राष्ट्रवादी’ प्रयोग!

निवडणुकांत शिवसेनेला सोबत न घेण्याचा ‘राष्ट्रवादी’ प्रयोग!

देशात पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांपैकी तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुका लढविणार असून मणिपूर, गोवा आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी आपले उमेदवार उतरविणार आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. पण एकीकडे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडीचा प्रयोग या आगामी निवडणुकांत करणार असल्याच्या घोषणा करत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र शिवसेनेला सोबत घेण्यास टाळाटाळ केली आहे. किंबहुना, आपल्या पत्रकार परिषदेत तीन राज्यांत निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करताना शरद पवारांनी शिवसेनेचा ओझरताही उल्लेख केला नाही.

गोव्यात आपण एकत्र लढले पाहिजे, अशी शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसंदर्भात भूमिका असली तरी हे दोन्ही पक्ष मात्र शिवसेनेला सोबत घेण्यास तयार नाहीत. काँग्रेसने तर गोव्यात शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी दाखविलेली नाही आता राष्ट्रवादीनेही त्यांना ठेंगा दाखविला आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांवरूनच राष्ट्रवादी शिवसेनेला कसा कात्रजचा घाट दाखवत आहे, ते स्पष्ट झाले. शरद पवार म्हणाले की, आम्ही तीन राज्यांत निवडणुका लढवणार आहोत. मणिपूर, गोवा, उत्तर प्रदेश. मणिपूरमध्ये आम्ही काँग्रेससह एकत्र लढणार आहोत. मणिपूरमध्ये पाच जागा आम्ही लढविणार आहोत. तर गोव्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात चर्चा सुरू आहे. आम्ही ज्या जागांवर लढू इच्छित होतो त्या जागांची माहिती दोन्ही पक्षांना दिली आहे. याचा अंतिम निर्णय दोन दिवसांत होईल.

हे ही वाचा:

विवो आयपीएल आता टाटा आयपीएल

कुस्तीगीराच्या हत्येआधी सुशीलकुमारने स्टेडियममध्ये कुत्र्यांवर गोळ्या झाडल्या होत्या…

कर्ज द्यायला नकार, पेटवून दिली बँक

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विकृत लिखाण करणाऱ्याला ठाणे भाजपा महिला मोर्चाचा चोप

 

उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी व छोट्या पक्षांचे गठबंधन झाले आहे. लखनौत यांची बैठक होईल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष के. के. शर्मा तिथे जातील व त्यात भाग घेतील. काही जागा लढविण्याबाबत चर्चा सुरू आहे. मीटिंग झाल्यावर लखनौमध्ये जागांचे वाटप कसे होईल हे स्पष्ट केले जाईल. उत्तर प्रदेशातील आमदार सिराज मेहंदी यांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ते उत्तर प्रदेशातील परिवर्तनाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र करून पर्याय देतील.

अनेकांशी आम्ही चर्चा केल्यानंतर हे स्वच्छ होत आहे की, उत्तर प्रदेशात परिवर्तन येणार आहे. लोकांना तिथे बदल हवा आहे. सांप्रदायिक विचार रुजविण्याचा प्रयत्न तिथे होतो आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विधान पाहिले तर ८० टक्के लोक आमच्यासोबत आहेत २० टक्के नाहीत, असे ते म्हणतात. याचा अर्थ मला जो समजतो त्यानुसार २० टक्के कोण असतील हे कळते. मुख्यमंत्री सगळ्यांचा प्रतिनिधी असला पाहिजे २० टक्के सोडून बाकी आमचे आहेत हे अल्पसंख्याकांना वेदना पोहोचवणारे आहे. मुख्यमंत्र्यांना हे शोभत नाही, पण त्यांची विचारधाराच ही आहे. त्यांची मनातली गोष्ट त्यांनी सांगितली. त्यामुळे एक स्पष्ट होते की, देशात सेक्युलर विचार मजबूत करण्यासाठी एकत्र यायला हवे. उत्तर प्रदेशची जनता याला चोख उत्तर देईल आणि परिवर्तन आणेल असे मला वाटते.

गोव्यात एकत्र येऊ का माहीत नाही!

गोव्यात शिवसेनेला सोबत घेणार का, या प्रश्नावर पवार बोलले की, गोव्यात एकत्र येता येईल का याची चर्चा झाली. शक्य असेल तर मला माहीत नाही. काँग्रेसचे धोरण माहीत नाही. माझ्या पक्षाच्या वतीने प्रफुल्ल पटेल, शिवसेना संजय राऊत व काँग्रेस यांच्यात चर्चा व्हावी असे बोलणे झाले. आमची इच्छा आहे. गोव्यातही परिवर्तनाची आवश्यकता आहे भाजपा हटवायला पाहिजे. असे प्रयत्न केले आणि त्यात यश आले तर मला समाधान वाटेल.

Exit mobile version