महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांची राजकीय फटकेबाजी महाराष्ट्राला पहायला मिळाली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधताना त्यांनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणावर भाष्य केले. राज्यात जातीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मापासून सुरू झाले असे राज ठाकरे म्हणाले.
जातीचे राजकारण घडवून मराठी माणसात फूट पाडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मापासूनच राज्यात जातीचे राजकारण सुरु झाले असा घणाघात ठाकरे यांनी केला. त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीचा अभिमान होता पण जातीवरून फूट नव्हती असे राज ठाकरे म्हणाले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना विरोध केला जातो कारण ते ब्राम्हण आहेत. आपण आपला इतिहास विसरलो आहोत का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर महाराष्ट्रात जातीच्या राजकारणाची कीड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मापासून वाढली असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उडविल्या चिंधड्या
अरविंद केजरीवालांच्या रोड शो साठी पैसे देऊन गर्दी
‘या’ कारणामुळे इन्फोसिस रशियातील सर्व कार्यालये बंद करणार?
भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा सुरू करा!
जेम्स लेन हे त्यांचेच पिल्लू. कोणीतरी एक बाहेरचा माणूस येतो काय, आपल्या शिवछत्रपतींच्या बाबत, जिजाऊ माँ साहेबांच्या बाबत काहीतरी घाणेरडं लिहितो काय आणि त्यावरून सतत तुमची माथी भडकवत ठेवायची आणि राजकारण करायचे हाच यांचा उद्योग आहे असा आरोप त्यांनी केला. उत्तर प्रदेशात कधी काळी अशी परिस्थिती होती की टपरीवर चहा मागितला तरी विचारलं जायचं कौनसे जाती के हो, महाराष्ट्रात अशी परिस्थिती आपल्याला आणायची आहे का? असा संतप्त सवाल यावेळी राज ठाकरे यांनी विचारला.