अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर राष्ट्रवादीचे सर्व नेते व मंत्री हळूहळू दाखल होत आहेत. तिथे यापुढील घडामोडी घडतील. नवाब मलिक यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे मंत्रिपद कुणाला देण्यात येणार हे लवकरच स्पष्ट होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुद्धा मुंबईकडे रवाना झाले आहेत. तिथे ते इतर मंत्र्यांसोबत सिल्व्हर ओकमध्ये येतील. त्याठिकाणी शरद पवारांशी या मंत्र्यांची चर्चा होणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटीला, छरगन भुजबळ अशी सर्व प्रमुख मंडळी बंगल्यावर येतील. तिथे चर्चा होईल आणि त्यानंतर अल्पसंख्याक खाते राष्ट्रवादीच्या अन्य नेत्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
ईडी कार्यालयातून बाहेर येताना नवाब मलिक आनंदी का होते?
तामिळनाडू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची जोरदार मुसंडी
‘अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परबांचा’
ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर काही नेत्यांसह शरद पवार हे वर्षावर जाणार असल्याचे कळते. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून कदाचित मलिक यांच्याजागी कोणत्या नव्या मंत्र्याची नियुक्ती करायची याविषयी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. काही नावे या पदासाठी चर्चेत आहेत.
बुधवारी सकाळी नवाब मलिक यांच्या घरावर ईडीने छापा मारला आणि त्यांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणण्यात आले. तिथे त्यांची चौकशी करण्यात आली. त्यादरम्यान, राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर जमले आणि त्यांनी घोषणाबाजी करत अटकेचा निषेध केला.