रश्मी शुक्लांना सीबीआय साक्षीदार बनवणार?

रश्मी शुक्लांना सीबीआय साक्षीदार बनवणार?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयने वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवल्याचे कळते. सध्या शुक्ला यांचे पोस्टिंग हैदराबाद येथे आहे. तिथेच हा जबाब नोंदविण्यात आला असे समजते. या प्रकरणात सीबीआय शुक्ला यांना साक्षीदार करणार असल्याचे कळते. त्यामुळे या प्रकरणाला कोणते वळण मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. सीबीआयकडून सध्या १०० कोटी वसुली प्रकरणाचा तपास सुरू आहे. ज्यामध्ये अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप केला होता असा आरोप त्यांच्यावर आहे. रश्मी शुक्ला यांनी याच बदल्यांमध्ये होणाऱ्या हस्तक्षेपावरून फोन टॅपिंग करून एक अहवाल बनवला होता जो गोपनिय होता. त्याअनुषंगाने २१ एप्रिलला त्यांचा जबाब नोंदवला गेल्याची माहिती आहे.

सध्या रश्मी शुक्ला यांचे पोस्टिंग हैदराबाद येथे आहे. नुकतीच मुंबईच्या सायबर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी समन्स पाठविले होते. पण करोनामुळे आपण चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. सायबर पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणात एका अज्ञात व्यक्तिविरोधात एफआयआर दाखल करून चौकशीला सुरुवात केली आहे.

सीबीआयने याआधी अनिल देशमुख, त्यांचे दोन पीए अनुक्रमे संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचे जबाब नोंदवले आहेत. तर निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि त्याच्या दोन वाहन चालकांसह अनेकांचे जबाब रेकॉर्ड करण्यात आले आहेत.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्य सरकारकडून चौकशी होण्यापूर्वीच महाविकासआघाडीचा ‘कार्यक्रम’ उरकून टाकला, असे ट्विट भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी केले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. हैदाराबादमध्ये काही दिवसांपूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रश्मी शुक्ला यांची चौकशी केली. या चौकशीत रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीतील दोन नेत्यांची नावं उघड केल्याचा गौप्यस्फोट अतुल भातखळकर यांनी केला होता.

हे ही वाचा:

चेन्नईचा सुपर विजय

महाराष्ट्रात आढळले ६३,३०९ नवे कोरोना रूग्ण

मोफत लशीची फक्त घोषणा, मग १ मेपासून लस का नाही?

लसीकरण केंद्रातील रांगांवर जालीम डोस कोणता?

अतुल भातखळकर यांनी बुधवारी यासंदर्भात ट्विट केले होते. त्यामध्ये रश्मी शुक्ला यांनी सीबीआय चौकशीत दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतल्याचा दावा भातखळकर यांनी केला होता. यापैकी एक अनिल म्हणजे देशमुख तर दुसरे अनिल म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांचे चेलेचपाटे आणि आणखी एक बडा नेता कोण असावा, याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Exit mobile version