मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या समन्स प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हैद्राबाद हायकोर्टात धाव घेतली आहे. चौकशीस बोलावण्याबाबत दिलेल्या समन्सला स्थगिती देण्याची याचिका रश्मी शुक्लांनी केली आहे. चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोपही शुक्ला यांनी केला आहे.
रश्मी शुक्ला यांनी २९ एप्रिलला याचिका दाखल केली होती. ६ मे रोजी या प्रकरणी हैद्राबाद हायकोर्टात सुनवाणी होणार आहे. मुंबई पोलिसांनी दोन वेळेला समन्स पाठवला होता. मुंबई पोलिसांनी आज चौकशीसाठी बोलावले होते. पोलिसांच्या पोस्टिंगबाबत गोपनीय कागदपत्रं लीक केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी समन्स पाठवले होते.
चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांनी याचिकेत केला आहे. याचिकेत राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि एसपी सायबर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणात सीबीआय शुक्ला यांना साक्षीदार करणार आहे. हैदराबादमध्ये रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला.
हे ही वाचा:
ममतांच्या पराभवाने कार्यकर्ते पिसाळले, सुवेंदू अधिकारींवर हल्ला
पंढरपूरमध्ये भाजपाला विठ्ठल पावला
निवडणुकांचे निकाल भाजपासाठी ‘समाधान’कारक
एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी बुधवार २८ एप्रिल रोजी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना समन्समध्ये सांगण्यात आले होते. रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांना सध्या चौकशीला येऊ शकणार नसल्याचं कळवलं आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता हजेरी शक्य नसल्याचं उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांनी दिलेल्या समन्सला दिलं. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असं रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला सांगितलं.