पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडच्या पोट निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली असून कसबा पेठमधून मुक्ता टिळक यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती पण हेमंत रासने यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे तर चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतापला उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाने बैठकीनंतर या निवडणुकीसाठी आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली. मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती पण त्यांच्याकडे पक्ष प्रवक्तेपदाची जबाबदारी दिलेली असल्यामुळे त्यांना आमदारपदाची संधी देण्यात आलेली नाही.
गेल्याच महिन्यात प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली होती, पण आता त्यात कुणाल टिळक यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. आता कसबा पेठ येथील जागेसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. हेमंत रासने हे भाजपाचे पुण्यातील जुने कार्यकर्ते आहेत. ते पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष होते तसेच दगडूशेठ गणपती मंडळाच्या माध्यमातूनही त्यांनी ३० वर्षे काम केलेले आहे. आपण आपल्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती पूर्ण करू, अशी प्रतिक्रिया रासने यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
पी. चिदंबरम यांच्या पत्नीची संपत्ती ईडीकडून जप्त
मध्य रेल्वे मार्गावर रविवार ५ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळ…
अजितदादांच्या मते उद्धव ठाकरेंमुळे सरकार कोसळलं?
सॅमसंगचे आता भारतातच ‘स्मार्ट’ उत्पादन
दरम्यान, काँग्रेसचे याच निवडणुकीसाठीचे उमेदवारही जवळपास जाहीर झाले आहेत. कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवडची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला द्यायची होती पण राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिल्याने उद्धव ठाकरे गटाने माघार घेतली.