महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे सरकार आल्यानंतर राजकारणाने एक वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या झालेल्या बदनामीची संपूर्ण भरपाई करण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांना विधान परिषदेचे सदस्यत्व दिले जाईल, अशी चर्चा आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यातील सदस्य असलेल्या काँग्रेसने वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अत्यंत खालच्या भाषेत अपमान केला. काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाने सावरकरांची बदनामी केली. त्यांच्या मुखपत्रातही सावरकरांबद्दल अवमानकारक मजकूर छापण्यात आला. या अपमानाबद्दल मविआमधील शिवसेनेने केवळ बघ्याची भूमिका घेतली. पण आता हे दिवस बदलले असल्याची भावना जनमानसात तयार झाली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांनी हिंदुत्वाचा नारा बुलंद करणार असल्याचे आपल्या कृतीतून दाखविले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देऊन हे सरकार हिंदुत्वाच्या विचारांवरच चालणार असल्याचे स्पष्ट केले. स्मारकातील सावरकरांच्या भव्य पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले. हिंदुत्वाचे प्रणेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दर्शन घेतल्याने मला पूर्ण समाधान मिळाले आहे. आमचे सरकार हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच स्थापन झाले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आमच्या आमदारांची घुसमट होत होती. हिंदुत्व आणि वीर सावरकरांचे विचार मांडताही येत नव्हते, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली होती.
हे ही वाचा:
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट
‘धनुष्यबाण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही’
कल्याण डोंबिवली, पुण्यातही शिवसेनेला खिंडार
‘मविआ सोडा, मोदींशी चर्चा करा’
स्वातंत्र्यवीरांच्या अपमानाची भरपाई करण्यासाठी एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारकडून रणजीत सावरकर यांना विधान परिषद सदस्यत्वाचा मान दिला जाण्याची चर्चा रंगली आहे.
हे सरकार स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रती श्रद्धा आणि आदराची भावना बाळगून आहे, याचे आणखी एक उदाहरण सांगणारी घटना ८ जुलैला घडली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एस. एस. मोरिया बोटीतून ब्रिटिशांच्या तावडीतून निसटून फ्रान्सच्या मार्सेय येथे पाऊल ठेवले होते. त्या साहसदिनाच्या म्हणजे ८ जुलै १९१० या दिवसाचा योग साधून स्वातंत्र्यवीरांच्या तैलचित्राचे अनावरण स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात झाले. या साहसदिनाला यंदा ११२ वर्षे झाली आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांनी हे चित्र साकारले असून त्यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती.