केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी शिवाजी पार्क मैदानातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन दर्शन घेतले.
राणे यांनी या स्मृतिस्थळाला भेट देऊ नये, असे शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत होते, पण राणे यांना कोणताही विरोध झाल्याचे दिसले नाही. राणे यांनी दुपारी या स्मृतिस्थळाला जाऊन दर्शन घेतले. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र नितेश आणि निलेश राणेही होते.
नारायण राणे यांची दोन दिवसीय जनआशीर्वाद यात्रा गुरुवारपासून सुरू झाली आहे. शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेर राणे यांची छबी टिपण्यासाठी प्रसारमाध्यमांनी मोठी गर्दी केली होती.
सावरकर स्मारकालाही भेट
नारायण राणे यांनी या यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकालाही भेट दिली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले.
त्यांनी स्मारकात आल्यानंतर प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला नमन केले. त्यानंतर त्यांनी स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांशीही भेट घेतली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर उपस्थित होते. त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना स्मारकाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा आणि सावरकरांचे ग्रंथ भेट देण्यात आले. यावेळी नारायण राणे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार आशीष शेलार आदी उपस्थित होते.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमधील राजकीय हत्यांचा तपास सीबीआय करणार
तालिबानपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करत आहेत महिला?
बूस्टर डोसबद्दल डब्ल्यूएचओने केले ‘हे’ महत्वाचे वक्तव्य
फ्रान्सने वाचवले २१ भारतीय नागरीक
नारायण राणे दोन दिवसांच्या जनआशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत आले आहेत. त्या दरम्यान विविध ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील तसेच सर्वसामान्यांशी संवादही साधतील. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची भाषणेही होणार आहेत.