सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे शनिवारी उद्घाटन झाले. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार असल्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या कार्यक्रमाकडे होते. पण नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांकडे पाहणे, बोलणेही टाळले. तरीही भाषणात नारायण राणे यांनी असा उल्लेख केला की, मुख्यमंत्री माझ्या कानात काहीतरी बोलले पण मला नीट ऐकू आले नाही. उद्धव ठाकरे नेमके काय बोलले यावरून नंतर चर्चा रंगली होती.
उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांचे चिपी विमानतळावरून आगमन झाल्यापासून ते उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यात काय संवाद होईल, ते बोलतील की नाही, भाषणात कोणते मुद्दे असतील अशा अनेक विषयांची चर्चा सुरू झाली होती. प्रत्यक्षात दोन्ही नेते समोरासमोर आल्यावर मात्र ते एकमेकांशी बोलले नाहीत किंबहुना त्यांनी एकमेकांकडे दुर्लक्ष केले. भाषणादरम्यान नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माझ्या कानात काहीतरी बोलले पण मला ते ऐकू आले नाही. ते नेमके काय बोलले याबद्दल मात्र उत्सुकता ताणली गेली.
शिलालेखावरील पडदा दूर केला तेव्हा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे बाजुबाजुला उभे होते पण ते एकमेकांशी बोलले नाहीत. नंतर सगळी मान्यवर मंडळी मंचावर विराजमान झाली तेव्हाही उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या खुर्च्या अगदी बाजुबाजुला होत्या. पण ते एकमेकांकडे बघतही नव्हते. मंचावर पोहोचल्यावर महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राणे यांना नमस्कार केल्यावर राणे यांनीही त्यांना नमस्कार केला. पण राणे आणि उद्धव यांनी एकमेकांना मात्र नमस्कारही केला नाही.
हे ही वाचा:
‘चिपी विमानतळाला विरोध कुणी केला हे लोक जाणतात’
‘पुष्पक एक्सप्रेस’ मध्ये दरोडा आणि सामूहिक बलात्कार
खो- खोपटू सारिका काळेने आपल्यावरील चित्रपटाचे मानधन खेळाडूंसाठी का दिले?
हज यात्रेला स्वस्तात पाठविण्याचे आमीष दाखविणारा पोलिसांच्या तावडीत
दोन्ही नेत्यांनी नंतर भाषणातही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात आपले श्रेय असल्याचे ठासून सांगितले. आणि इथे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर दिसते आहे ते आपल्यामुळेच उभे राहिले, बाकी इथे कुणी येऊच शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी हा दिवस आदळआपट करण्याचा नाही, अशी टिप्पणी केली.