नारायण राणे यांचा घणाघात
संजय राऊत, विनायक राऊत यांच्याकडून सातत्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लक्ष्य केले जाते. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, शिवसेनेकडे सत्ता आहे. मी कुणावर कधी आरोप करत नाही. संजय राऊत यांनी असे धंदे करू नये. त्यांचा जीव केवढा आहे, याचा विचार करावा. शिवसेना खड्ड्यात घालायचे काम ते करत आहेत. शिवसेनेला ते मदत करत नाहीत. विकासात्मक विषयावर ते लिहू शकत नाहीत. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत राणे यांनी राऊत यांच्यावर शरसंधान केले.
अनेक नेते शिवसेनेतून बाहेर गेल्यावर शिवसेनेवर बोलले नाहीत पण आपण विरोध करता, यावर राणे म्हणाले की, माझा कुणावरही वैयक्तिक राग अजिबत नाही. मी साहेबांना शब्द दिला होता की, साहेब माझ्यापासून ठाकरे कुटुंबाला कोणताही त्रास होणार नाही. ही मी खबरदारी घेईन. पण उठल्यासुटल्या नारायण राणे, नारायण राणे केल्यावर काय करणार?मी कधीही आदित्यवर बोललो नाही. उद्धवजींवर बोललो नाही. पण संजय राऊत यांच्या माध्यमातून हे सुरू झालं त्यामुळे उत्तर देणं हे माझं काम आहे. मी ऐकून घेणार नाही, असेही राणे यांनी ठणकावून सांगितले.
अटकेच्या घटनेनंतर राणे मवाळ झाले असे म्हटले जात आहे, त्यावर ते म्हणाले की, मवाळ होणे हे माझ्या रक्तात नाही. मी लोकांशी लढलो. शिवसेनेच्या विरोधकांशी पूर्वी लढलो. ९१ पासून मला संरक्षण आहे. यांना कधी कुणी मारायला गेले का? माझ्याच मागे का लागले. राणे म्हणाले की, राजकारणात मी फायद्याचं काय ठरेल याचा विचार करत नाही. लोकांच्या फायद्याची गोष्ट समजून त्यांच्यासाठी भांडणे एवढेच नाही तर प्राणांची पर्वा न करता समोरच्यावर तुटून पडणे, हा माझा स्वभावगुण आहे. हा नैसर्गिक गुण आहे. काही हात वर करून आवेश दाखवतात, पण माझ्या रक्तातच हा स्वभाव आहे.
हे ही वाचा:
नाट्यसमीक्षेला एक वेगळी उंची देणारा जयंत!
गजाआड! करत होते अल्पवयीन मुलीचा ऑनलाईन लैंगिक छळ
लव्ह जिहादच्या घटनेने हादरले नेवासा…दलित कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे अपहरण
सरकारने माझ्यावर कारवाई केली मी वैयक्तिक कुणालाही दोष देत नाही. सरकारचा प्रमुख कोण हे माहीत आहे. त्यांच्यामुळेच हे घडले आहे, असे माझा म्हणणे आहे, अशी टिप्पणीही राणे यांनी केली.