खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी शनिवारी अटक केले होते. सुनावणीसाठी मुंबईतील वांद्रे न्यायालयात राणा दाम्पत्यांना हजर केले होते. त्या सुनावणीत राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यानुसार राणा दाम्पत्य जामिनासाठी अर्ज करू शकणार आहेत.
वकील प्रदीप घरत यांनी सरकारची बाजू मांडली आहे. घरत यांनी राणा दाम्पत्यांच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, राणा दाम्पत्यांचे वकील रिझवान मर्चट यांनी न्यायालयाला राणा दाम्पत्यांची अटक कशी बेकायदेशीर आहे, हे पटवून दिले. त्यांनतर न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून कोठडीची मागणी फेटाळत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी खंडपीठाने त्यांना सुनावली.
न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर लगेच राणा दाम्पत्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र त्या जामीन अर्जावर २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. वांद्रे न्यायालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. दरम्यान, जामीनाचा निकाल येईपर्यंत राणा दाम्पत्यांची रवानगी तुरुंगात करण्यात येणार आहे. नवनीत राणा यांची रवानगी भायखळा जेलमध्ये होणार आहे. तर रवी राणा यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये होणार आहे.
हे ही वाचा:
राणा दाम्पत्यांविरोधात दुसरा गुन्हा दाखल
‘माझा दुसरा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न’
किरीट सोमय्यांवर झालेला हल्ला चुकीचा
मुंबई पोलीस आयुक्त उद्धव ठाकरेंचे चपरासी आहेत का?
कलम १५३ ‘अ’ च्या अंतर्गत दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करण्यावरून राणा दाम्पत्यांविरोधात त्यांना अटक करण्यात आली होते. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी, कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच १२४ ‘अ’ अंतर्गत द्वेष पसरवणे हे कलम देखील राणा दाम्पत्यांवर लावले आहे. त्यानुसार ही सुनावणी झाली आहे.
१२४ ‘अ’ नुसार, जो कोणी व्यक्ती, शब्दांद्वारे, एकतर बोलून किंवा लिहून, किंवा चिन्हांद्वारे, किंवा दृश्यमान प्रतिनिधित्वाद्वारे, किंवा अन्यथा, द्वेष किंवा अवमान आणण्याचा प्रयत्न करतो. किंवा कायद्याने स्थापन केलेल्या सरकारच्या विरोधात उत्तेजित करणे किंवा असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.