खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा आज १२ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. बुधवार, ४ मे रोजी राणा दाम्पत्यांचा जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर राणा दाम्पत्यांकडून आज ५०-५० हजार रुपयांचे जामीनपत्र बोरिवली न्यायालयात जमा करण्यात आले. नवनीत राणांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र राणांनी केवळ हात जोडले.
नवनीत राणांना मानदुखीचा आणि छातीत दुखत असल्याने तुरूंगातून सुटका होताच त्या लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांनतर ४ वाजता रवी राणांची सुटका करण्यात आली असून, ते थेट लीलावती रुग्णालयात नवनीत राणांच्या भेटीसाठी गेले. नवनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या त्यांच्या भेटीसाठी गेले होते.
मुंबईतील बोरीवली न्यायालयाने बुधवारी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला. त्यानंतर न्यायालयाकडून सुटकेचा आदेश मिळाल्यानंतर पोलिसांची एक टीम भायखळा तर दुसरी टीम तळोजा तुरुंगाकडे रवाना झाली होती. त्यानंतर राणा दाम्पत्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. नवनीत राणा यांना भायखळा महिला कारागृहात तर रवी राणांची तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
हे ही वाचा:
भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेंविरोधात पुरावे नाहीत
बँडस्टँड येथील मोक्याचा शासकीय भूखंड कवडीमोल किंमतीने बिल्डरच्या घशात
साईंची आरती भोंग्यावर होऊ दे, मुस्लिम समाजाची प्रशासनाला विनंती
दरम्यान, राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालीसा पठाण करण्यासाठी आले होते. मात्र राणा दाम्पत्यांच्या इमारतीसमोर शिवसेना कार्यकर्त्यांनी राडा घातला. त्यांनतर राणा दाम्पत्यांना राजद्रोहाच्या कलमाखाली आणि दोन समाजात तेढ निर्माण केल्यामुळे अटक करण्यात आली होती. मात्र राणा दाम्पत्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी ही केसच बोगस असल्याचे म्हटले होते.