राजद्रोहाच्या गुन्ह्याअंतर्गत तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आता जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आज, ४ मे रोजी राणा दाम्पत्याला दिलासा देत जामीन मंजूर करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर काही दिवस ते पोलीस कोठडीत होते त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
जामीन मंजूर झाल्यानंतर राणा दाम्पत्याला न्यायालयात सुरू असलेल्या विषयासंबंधी माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली. तसेच पोलिसांना त्यांची हजेरी हवी असल्यास त्यांनी २४ तास आधी नोटीस द्यावी अशा काही अटी टाकण्यात आल्या आहेत.
न्यायालयाच्या निर्णयानंतर अमरावती येथे कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मशिदीवरील भोंगे उतरवणे आणि हनुमान चालीसा पठण यावरून वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा नवनीत राणा आणि रवी राणांनी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती.
हे ही वाचा:
नितेश राणेंच्या निशाण्यावर पुन्हा रझा अकादमी, पीएफआय
राज्यात अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान
राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस
भोंगे हटविण्यासाठी एकत्र या, आता नाही तर कधीच नाही!
दरम्यान, राणा दाम्पत्याच्या खारमधील घराला मुंबई महापालिकेने नोटीस जारी केली आहे. घराचं बांधकाम अनधिकृत असल्याच्या तक्रारीनंतर ही नोटीस जारी करण्यात आली आहे.