रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मविआला दणका

रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला जोरदार दणका बसला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने त्यांना रामटेकमधून उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी त्यांच्या मतदारसंघात प्रचार सुरू केला होता. अशातच त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. जात वैधता पडताळणी समितीने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मविआ आणि काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर जात वैधता पडताळणी समितीकडून हा निर्णय आल्याने रश्मी बर्वे यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे. रश्मी बर्वे या काँग्रेसच्या रामटेक मतदारसंघाच्या उमेदवार आहेत. रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचाही मुद्दा समोर आला. जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यात आलेली नाही, असा दावा करण्यात आला होता.

लोकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज रश्मी बर्वे यांनी दाखल केला आहे. हा अर्ज दाखल करताना त्यांनी रामटेकमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन देखील केले. मात्र, अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जात वैधता पडताळणी समितीने बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवले आहे. या निर्णयामुळे रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरण्याची शक्यता आहे.

रश्मी बर्वे यांनी जात वैधता प्रमाणपत्र बनविण्याकरिता जात पडताळणी समितीकडे खोटे दस्तावेज सादर केले आणि वैधता प्रमाणपत्र मिळवले. त्यामुळे त्यांच्या प्रमाणपत्रांची पुनःश्च तपासणी करुन फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करणारी तक्रार जिल्हा जात पडताळणी समितीकडे दाखल करण्यात आली होती. यावर समितीने वेळोवेळी बर्वे यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु बर्वे या समितीसमोर गैरहजर राहिल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

‘निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत’

२८ वर्षे जुन्या खटल्यात आयपीएस अधिकारी संजीव भट्ट दोषी

संदेशखालीतील महिला म्हणजे ‘शक्तीस्वरूप’

“खिचडी चोराचं काम करणार नाही”

अखेर समितीने रश्मी बर्वे यांच्या घराच्या दारावर नोटीस चिकटवून अखेरची संधी असल्याचेही म्हटले होते. मात्र, तेव्हाही रश्मी बर्वे चौकशीला उपस्थित राहिल्या नाहीत. अखेर त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे समितीने जाहीर केले आहे. यावर आता जिल्हाधिकारी निर्णय घेणार असून त्यांनी निकाल राखून ठेवला आहे. या कारवाईवर उमेदवार रश्मी बर्वे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी खच्चीकरण करण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Exit mobile version