काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू असल्यामुळे काँग्रेसने देशभरात आंदोलने सुरू केली आहेत. मात्र कर्नाटकात अशाच एका आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.आर. रमेश कुमार यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेसच अडचणीत आली.
रमेश कुमार म्हणाले की, आम्ही नेहरू, गांधी कुटुंबाचे नाव वापरून गेल्या ३-४ पिढ्या भरपूर कमाई केली आता आम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहायला हवे. काँग्रेसने या ईडी चौकशीच्या विरोधात कर्नाटकात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे बेंगळुरू शहरातील रहदारीवर परिणाम झाला. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि त्यात दोन गाड्या पेटविण्यात आल्या.
कुमार या आंदोलनाच्या दरम्यान म्हणाले की, सोनिया गांधी यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. आम्हाला त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. गेल्या ६० वर्षांत आम्ही नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्या नावावर ३-४ पिढ्या भरपूर कमाई केली. जर आता आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो नाही तर आमच्या जेवणात किडे पडतील.
रमेश कुमार यांच्या या विधानामुळे भाजपाने त्याला प्रत्युत्तर दिले. कर्नाटक भाजपाने ट्विटरवर म्हटले आहे की, रमेश कुमार हे गांधी कुटुंबाचे ऋण फेडण्याची भाषा करत आहेत पण गेल्या ६० वर्षात ज्या लोकांनी त्यांना सत्तेत ठेवले त्यांची त्यांना चिंता नाही.
हे ही वाचा:
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये साडेतीन कोटींच्या हिऱ्यांची लूट!
…म्हणून सलमान खानने घेतली पोलीस आयुक्तांची भेट!
अग्निपथ योजनेविरोधातील जाळपोळ, आंदोलनांतून रेल्वेची २५९ कोटींची हानी
मस्तीत मित्राला दिला धक्का आणि…
दरम्यान रमेश कुमार यांनी आपले हे विधान मागे घेण्यास नकार दिला. ते म्हणाले की, मी माझे शब्द अजिबात मागे घेणार नाही. माझे वक्तव्य नेहमीच थेट असते. आम्ही गांधी कुटुंबाच्या माध्यमातून स्वतःचा फायदा केला. त्यामुळे आता त्यांच्या पाठीशी आम्हाला उभे राहायला हवे.