परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासंदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या नजरेतून उतरलेल्या रामदास कदम यांचे पोस्टर्स आता ठाण्यात झळकले आहेत. पण त्यात शिवसेनेचा साधा उल्लेखही नाही. त्यामुळे कदम आणि शिवसेना यांच्यातील वितुष्ट आणखी वाढले असल्याचे बोलले जात आहे.
कोकणचा ढाण्या वाघ असे लिहिलेले पोस्टर्स ठाण्यात लावण्यात आले आहेत. कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक आज आमचीच सुपारी द्यायला निघालेत त्यांना पुन्हा एकदा आठवण देतो बाप बापच असतो, असे या पोस्टर्सवर लिहिले आहे. या पोस्टरवर रामदास कदम यांचे मोठे चित्र लावण्यात आले आहे आणि त्या मागे शिवसेनेच्या वाघाचेही चित्र आहे. शिवाय, स्थानिक शिवसेना नेत्यांचे फोटोही आहेत पण शिवसेनेचा थेट उल्लेख कुठेही नाही. त्यामुळे हे पोस्टर्स कुणी लावले, कोण त्यामागे आहे, याची चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे.
रामदास कदम यांच्यावर अनिल परब प्रकरणात आरोप झाल्यावर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. आपल्याला बदनाम करण्यात येत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होते.
भाजपा नेते किरीट सोमैय्यांनी यांनी अनिल परब यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर त्यांना शिवसेनेच्या नेत्याकडून सगळी माहिती पुरविण्यात येत असल्याची शंका उपस्थित केली जात होती. कदम यांच्या नावाची त्यानंतर चर्चा सुरू झाली होती.
हे ही वाचा:
संस्कार भारतीचे अखिल भारतीय सरचिटणीस अमीरचंद कालवश
अनिल देशमुखांना विसरा, परमबीरना शोधा!
बंगालमध्ये दुर्गा विसर्जनाच्यावेळी गेलेल्या भाविकांवर बॉम्ब हल्ला!
पुण्यात गाडीने पोलिसाला ८०० मीटर फटफटत नेले
रामदास कदम यांनी परब यांच्यासंदर्भात एका कार्यकर्त्याशी फोनवरून केलेले भाष्य चांगलेच गाजले होते. त्यांनीच परब यांच्याविरोधातील पुरावे दिल्याचा संशय त्यामुळे व्यक्त केला गेला. त्यानंतर रामदास कदम हे शिवसेनेच्या आघाडीच्या नेत्यांच्या पंक्तीतून बाहेर फेकले गेले. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यातही त्यांना बोलावण्यात आले नाही. आपण प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहणार नाही, अशी त्यांनी बाजू सावरून धरली होती.