शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज (शनिवार, १८ डिसेंबर रोजी) पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्ला चढवला आहे. रामदास कदम यांच्या या पत्रकार परिषदेमुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. यावेळी बोलताना रामदास कदम यांनी थेट अनिल परब यांचा बाप काढला आहे. ‘अनिल परब म्हणतात ते आमदारांना निधी देणार नाहीत. तो पैसा अनिल परबच्या बापाचा पैसा आहे का? असा संतप्त सवाल रामदास कदम यांनी केला आहे.
शिवसेना नेते रामदास कदम विरुद्ध अनिल परब यांच्यातील वर्चस्वाचा संघर्ष चांगलाच टोकाला गेलेला दिसत आहे. रामदास कदम यांची काही दिवसांपूर्वी एक ध्वनिफीत प्रसिद्ध झाली होती. यामधील संभाषणावरून अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट संदर्भात रामदास कदम यांनी कृर्त सोमैय्यांना मदत केल्याचा आरोप झाला होता. तर काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांच्या निष्ठावंतांना डावलून शिवसेनेची पदे वाटण्याचे काम परब यांनी केले.
हे ही वाचा:
‘अशोकराव, उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता?’
‘अमरावतीची घटना पुन्हा घडली तर त्यांना सोडायचे नाही’
मुंबईत काळाबाजारीचे दहा कोटींचे गहू, तांदूळ जप्त
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे की अनिल परब?
यानंतर आज कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परबांवर निशाणा साधला आहे. अनिल परब हे गद्दार असुन कोकणातील शिवसेना संपवायला निघाले आहेत असा घणाघात रामदास कदमांनी केला आहे. तर अनिल परब यांच्या नुकत्याच झालेल्या कोकण दौऱ्यावरही कदम यांनी टीकास्त्र डागले आहे.
अनिल परब यांना आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना भेटायला वेळ नाही. पण नुकताच त्यांनी ३ दिवसांचा रत्नागिरी दौरा केला. कोकणात सभा घेऊन ‘याची हकालपट्टी, त्याची हाकलपट्टी’ घोषणा करतात. आमदारांना निधी देणार नाही असे सांगतात. तो पैसा अनिल परब तुझ्या बापाचा आहे का? जिल्हा नियोजनाचा पैसा हा अनिल परबच्या मालकीचा आहे का? तू पैसे न देणारा कोण?
तू जी गोपनीयतेची शपथ घेतलीस त्याचा हा भंग केला आहेस. याबाबत मी उद्धव ठाकरे यांना सांगणार असून वेळ पडली तर अनिल परबांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा रामदास कदम यांनी दिला आहे.