शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना शिवसेनेचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांनाही शिवसेनेने धक्का दिला आहे. जिल्हास्तरीय नियुक्त्यांमध्ये कदम यांना कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता रामदास कदम यांचे भवितव्य काय असेल याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शिवसेनेने जिल्हास्तरीय नव्या नियुक्त्या घोषित केल्या त्यात कदम यांना स्थान देण्यात आलेले नाही. शिवाय, रामदास कदम यांच्या समर्थकांनाही या नियुक्त्यांपासून दूर ठेवण्यात आले आहे.
मागे रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात अनिल परब यांच्यासंदर्भात काही उल्लेख होते. त्या ऑडिओ क्लिपचा फटका रामदास कदम यांना बसला आहे, असे म्हटले जात आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकातही रामदास कदम यांचा विचार झाला नाही. त्यावेळी वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेने संधी दिली. त्या मतदार संघात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे आमदारकीसाठी उभे राहिले होते. त्याची भरपाई सुनील शिंदे यांना उमेदवारी देऊन करण्यात आली. शिंदे हे तिथून बिनविरोध विधान परिषदेवर गेले आहेत.
हे ही वाचा:
UNESCO च्या संस्कृतिक वारसा यादीत दुर्गा पूजेचा समावेश
बांगलादेश मुक्तीचा सुवर्ण महोत्सव
सोशल मीडियाच्या व्यसनापायी १६ वर्षीय मुलाने गमावला जीव
मात्र रामदास कदम यांचा तिथे विचार झाला नसल्याची चर्चा झाली होती. पण आपण या निवडणुकीसाठी इच्छुकच नसल्याचे कदम यांनी म्हटले होते. आता रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव तसेच समर्थकांना बाजुला ठेवल्यामुळे यानंतर कदम हे कोणती भूमिका घेणार हे लवकरच स्पष्ट होईल. तूर्तास अनिल परब यांच्या पाठीशी शिवसेना ठाम असल्याचे दिसते आहे.