‘नवी मुंबईत वॉर्ड आहेत एकशे अकरा, काँग्रेस-राष्ट्रवादीचा करायचा आहे बकरा, आम्ही चालू देणार नाही शिवसेनेचा नखरा, भाजप-आरपीआय युतीच्या विजयासाठी गणेश नाईक आणि मी मारणार आहे नवी मुंबईच्या चकरा!’, अशी कविता ऐकवत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत रिपाइचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना आठवले यांनी सरकारवर ही टीका केली.
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात रिपाइंचा हा कार्यकर्ता मेळावा आज पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने रामदास आठवले यांनी पालिका निवडणुकीचे रणशिंगही फुंकले. यावेळी रिपाइंचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुमंतराव गायकवाड, सुरेश बारशिंग, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओव्हाळ, यशपाल ओव्हाळ, बाळासाहेब मिरजे, विजय गायकवाड, जयश्री सुरवसे, असे मान्यवर उपस्थित होते.
हे ही वाचा:
“उद्धवजींचे सरकार ना रामाचे, ना भिमाचे, ना काही कामाचे” – रामदास आठवले
आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसोबत रिपब्लिकन पक्ष युती करून किमान ८ जागांवर आपले उमेदवार उभे करेल. भाजपला २५ जागांची यादी दिली असून त्यातील ८ जागा रिपाइंला देण्यात याव्या असा प्रस्ताव भाजपला दिला असल्याचे आठवले यांनी सांगितले. अनेकांनी झेंडा बदलला; पक्षाचे नाव बदलले मात्र आम्ही कधीही हाती घेतलला निळा झेंडा खाली ठेवणार नाही. आम्ही कधीही रिपब्लिकन नाव बदलणार नाही. आम्ही अभिमानाने जगाला सांगत आहोत आमची घोषणा आहे ‘मी रिपब्लिकन’! माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.