मालाड मधील मालवणी पाठोपाठ आता औरंगाबादमध्येही राम जन्मभूमीचे बॅनर्स फाडून काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या औरंगाबाद महापालिकेतर्फे ही कारवाई करण्यात आली असून ही कारवाई करताना कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांचा वापर करण्यात आला आहे. महापालिकेने केलेली ही कारवाई सूडबुद्धीतून केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे.
१५ जानेवारी पासून भारतभर राम मंदिर निधी संकलन अभियान सुरु झाले आहे. या निमित्ताने रामजन्मभूमीसाठी निधी देण्याचे आवाहन करणारे बॅनर्स औरंगाबादमध्ये ठिकठिकाणी लागले होते. पण औरंगाबाद महापालिकेने बॅनर विरोधी मोहिमेच्या नावाखाली हे बॅनर्स फाडून काढले. धक्कादायक बाब म्हणजे प्रभू रामचंद्रांचा फोटो असणारे हे बॅनर्स कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांमधून नेण्यात आले. या बॅनर्सवर कुठलाही आक्षेपार्ह मजकूर नव्हता तरीही औरंगाबादमधील हिंदू राष्ट्र चौक, मल्हार चौक, के पॉन्ड हॉस्पिटल, हॉटेल चौरंगी या परिसरातील बॅनर्स उतरवण्यात आले. औरंगाबाद महापालिकेने या कारवाईमागे बॅनरविरोधी मोहिमेचे कारण दिले असले तरीही या मोहिमेत सत्ताधारी शिवसेनेच्या बॅनर्सना हात लावलेला नाही. त्यामुळे महापालिकेची कारवाई ही सूडबुद्धीने आणि एकांगी असल्याचा आरोप औरंगाबाद भाजपाने केला आहे.
हे ही वाचा: पोलिसांनी मुंबईत अनेक ठिकाणी हटवले रामवर्गणीचे बॅनर
भाजपा आक्रमक…गुन्हा नोंदवायची भाजपाची मागणी
औरंगाबाद महापालिकेच्या या कारवाई विरोधात भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. औरंगाबादमधील भाजपा कार्यकर्त्यांनी या कारवाई विरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. “महापालिकेच्या कृत्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या असून असे निषेधार्ह कृत्य करणाऱ्या महापालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात यावा” अशी मागणी औरंगाबाद भाजपा अध्यक्ष संजय केणेकर यांनी केली आहे