हिंदुत्वाचा प्रचार करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री असलम शेख यांनी मुंबईतील एका मैदानाला टिपू सुलतानचे नाव दिले आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त असलम शेख यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन होणार आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार राम कदम यांनी यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
आमदार राम कदम म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचा सल्ला देत होते आणि स्वत:ला सर्वात मोठे हिंदुत्व म्हणत होते, मात्र आता त्यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने मालाडमध्ये टिपू सुलतानच्या नावाने मैदानाचे उद्घाटन केले आहे. राम कदम म्हणाले की, टिपू सुलतान हा आक्रमक होता. त्याने लाखो हिंदूंना मारले, आमची मंदिरे फोडली आणि लुटली, असे राम कदम म्हणाले.
शिवसेनेच्या राजवटीत अशाच एका व्यक्तीच्या नावावर मैदान बनवले जात आहे. शिवसेनेला आता हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही, असे राम कदम म्हणाले. शिवसेनेचे हिंदुत्व आता सर्वांना दिसत आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
वनडे मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू म्हणतो जय श्री राम
वर्ध्यात भीषण अपघात; आमदाराच्या मुलासह ६ विद्यार्थी ठार
राज्यातील ८९ टक्के नमुने हे ओमायक्रोन बाधित; आठव्या चाचणीचे निष्कर्ष
रेल्वेचालक अडीच तास निवांत झोपला आणि गाडी लेट झाली!
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर या मैदानाच्या नावावरून टीकास्त्र सोडले होते. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला होता. ठाकरे सरकारवर मुघल ए आझम-२ काढता येईल असे हिरवे वातावरण गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात निर्माण झाले आहे, असेही अतुल भातखळकर म्हणाले.