तथाकथित शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला धमकी दिली आहे. सरकारने २६ नोव्हेंबरपर्यंत नवे कृषीविषयक कायदे मागे न घेतल्यास दिल्ली सीमेवर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आज सरकारला दिला आहे. भारतीय किसान युनियन (BKU) प्रमुखांचा नवा इशारा शेतकरी आंदोलनादरम्यान आला आहे. या कृषीविषयक कायद्यांना जवळजवळ एक वर्षाचा काळ लोटला आहे.
“केंद्र सरकारकडे २६ नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे, त्यानंतर २७ नोव्हेंबरपासून शेतकरी गावागावातून ट्रॅक्टरद्वारे दिल्लीच्या आसपासच्या आंदोलनस्थळी सीमेवर पोहोचतील. भक्कम तटबंदीसह आंदोलनस्थळी उपस्थित राहतील.” असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
दोन दिवसांत त्यांनी केंद्राला दिलेला हा दुसरा इशारा आहे. रविवारी, टिकैत यांनी सरकारला इशारा दिला होता की त्यांनी दिल्लीच्या सीमेवरून आंदोलकांना जबरदस्तीने हटविण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील. “जर शेतकर्यांना जबरदस्तीने सीमेवरून हटवण्याचा प्रयत्न झाला, तर ते देशभरातील सरकारी कार्यालये गल्ला मंडई (धान्य मार्केट) मध्ये बदलतील.” असं ते म्हणाले.
हे ही वाचा:
निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाने हार पत्करली?
जी-२० परिषदेत मोदींनी हवामान, शेती विषयाची केली यशस्वी मांडणी
गोवत्सद्वादशी… दिवाळीचा पहिला दिवस!
श्री टिकैत यांनी असेही सांगितले की जर प्रशासनाने आंदोलनाच्या ठिकाणी आमचे तंबू पाडण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी त्यांना पोलीस स्टेशन आणि जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात उभे करतील.
राकेश टिकैत यांनी एएनआयला सांगितले की, “प्रशासन येथे तंबू पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे आम्हाला समजले आहे. जर त्यांनी तसे केले तर शेतकरी पोलीस स्टेशन, डीएम कार्यालयात तंबू लावतील.” राकेश टिकैत यांनी एएनआयला सांगितले.