दिल्लीत प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते आणि भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी केलेल्या विधानामुळे सर्वच शेतकरी नेते अडचणीत आले. लखीमपूर खेरी प्रकरणी त्यांनी ‘क्रिया- प्रतिक्रिये’ संबंधित विधान केल्यामुळे व्यासपीठावरील सर्व शेतकरी नेते अचंबित झाले.
लखीमपूर खेरीमधील शेतकऱ्यांना कारखाली चिरडून टाकण्याच्या घटनेनंतर आंदोलकांनी भाजप कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीत दोन भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. त्याचे टिकैत यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केले. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चातील नेत्यांना शांततेने आंदोलन करण्याची संघटनांची भूमिका वारंवार मांडावी लागली.
हे ही वाचा:
शिष्यवृत्तीच नाही, फिजिओथेरपिचे निवासी डॉक्टरही संपावर
भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी प. बंगालमध्ये ११ जणे अटकेत
नवाब मलिकांची मती भंगार मध्ये गेलेली
सीबीआयच्या सुबोध जैसवाल यांना सीआयडीचे समन्स
टिकैत यांनी ही ‘क्रियेवरील प्रतिक्रिया’ होती! असे विधान केले. ‘शेतकऱ्यांची हत्या केल्यामुळे संतापाच्या भरात लोकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. ही कृती पूर्वनियोजित नव्हती. भाजप कार्यकर्त्यांच्या मृत्यूला शेतकऱ्यांना जबाबदार मानता येणार नाही. मी त्यांना दोषी मानत नाही,’ असे राकेश टिकैत यांनी सांगितले. राकेश टिकैत यांच्या विधनानंतर योगेंद्र यादव यांनी टिकैत यांना सांभाळून घेत भारतीय दंडविधानामध्ये हत्येसंदर्भात वेगवेगळे अनुच्छेद कसे लागू होतात, जाणीवपूर्वक न झालेली हत्या, सुनियोजित हत्या आदी फरक दाखवून मुद्दे मांडले.
दिल्लीत प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला डॉ. दर्शन पाल, जगजीत सिंह डल्लेवाल, जोगिंदरसिंह उगराहां, युद्धवीर सिंह, योगेंद्र यादव आदी प्रमुख शेतकरी नेते उपस्थित होते.