राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान; शुक्रवारी पक्षापक्षांमध्ये घमासान

राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान; शुक्रवारी पक्षापक्षांमध्ये घमासान

राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान १० जून रोजी होत असून या निवडणुकीत सहावा उमेदवार कुणाचा निवडून येणार यावरून सध्या रणकंदन माजले आहे. शिवसेनेने संजय पवार यांच्या रूपात दुसरा उमेदवार उभा केला असून भाजपाने धनंजय महाडिक यांना उमेदवारी देत आपला तिसरा उमेदवार दिला. त्यामुळे सहाव्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे.

पहिल्या पसंतीची आवश्यक मते ज्याला पडतील तो उमेदवार पहिल्या प्रयत्नात निवडून येणार आहे. त्यामुळे ही मते मिळविण्यासाठी सगळ्या पक्षांची धावपळ सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून आपापले आमदार सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी आपले आमदार ट्रायडंट हॉटेल येथे ठेवले असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार ताज हॉटेलमध्ये आहेत. अपक्ष आमदार कुणाच्या पाठीशी आहेत, यावर सारे काही अवलंबून आहे. त्यावरून तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

भाजपाचे पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक हे उमेदवार आहेत तर शिवसेनेतर्फे संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील प्रतापगढी यांच्यावर विश्वास दाखविला आहे तर राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी दिली आहे.

प्रत्येक उमेदवाराला ४१ मते मिळणे गरजेचे आहे, असे समोर आले आहे. याआधी ही संख्या ४२ होती पण राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नाही. त्यांनी मतदानासाठी एक दिवसाचा जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता पण तो फेटाळण्यात आला. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे एकूण मतदारांची संख्या २८५ झाली आहे. त्यामुळे आता विजय मिळविण्यासाठी उमेदवाराला प्रत्येकी ४१ मते मिळविणे आवश्यक असेल.

हे ही वाचा:

‘आंदोलन करून कार्यकर्ते पंकजा मुंडेंचं नुकसान करणार’

केतकी चितळे ठरली राष्ट्रवादीपेक्षा सरस!

मोबाईल काढून घेतला म्हणून मुलाची आत्महत्या

मलिक,देशमुखांची मतदानासाठी केलेली याचिका फेटाळली

 

या निवडणुकीसाठी छोटे पक्ष, अपक्ष यांची मनधरणी सुरू आहे. विविध आमदारांच्या भेटी घेऊन त्यांनी आपल्याला मते द्यावीत यासाठी प्रयत्न होत आहेत. त्या अर्थाने १० जून या दिवशी नेमके काय होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीतून महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळेल, असे बोलले जात आहे.

Exit mobile version