काँग्रेसची गळती कायम ; प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेना प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश

काँग्रेसची गळती कायम ; प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेना प्रवेश

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला गळती लागली असून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. आता नेत्यांनंतर प्रवक्त्यांनीही वेगळी वाट धरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आणि पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारे राजू वाघमारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू वाघमारे यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी बोलताना राजू वाघमारे म्हणाले की, काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे पक्षाची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेस पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली दबलेला पक्ष झाला आहे. सांगली आणि भिवंडी येथील जागेबाबत असाच निर्णय झाला. सांगलीची जागा शिवसेनेने जाहीर केली. तर, भिवंडीची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. यामुळेचं कॉमन मॅन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश घेत आहे, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास काय आहे, हे दाखवून दिले आहे. त्यांनी कमी वेळेत राज्याचा मोठा विकास केला आहे. आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्री यांनी असे काम केले नाही. हे विरोधकांना देखील मान्य करावे लागेल, असं राजू वाघमारे म्हणाले.

हे ही वाचा:

अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू!

सौदी अरेबियाने काश्मीरबाबत भारताच्या भूमिकेचे केले समर्थन!

‘सरकारने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मणिपूरची परिस्थिती सुधारली’

एलन मस्क यांनी टाकले मार्क झुकेरबर्गला मागे!

लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना काँग्रेसमधून एकामागे एक नेते बाहेर पडत आहेत. मुंबईतील बडे राजकीय व्यक्तीमत्व मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी पक्ष सोडला. त्यानंतर बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसची साथ सोडली. दरम्यान, त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम करत भाजपाला साथ दिली. अशातच राजू वाघमारे यांच्या रूपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसला आहे.

Exit mobile version