विविध मुद्द्यांवरून विरोधक ठाकरे सरकारला कोंडीत पकडत असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारच्या कामासंदर्भात निराशा व्यक्त केली आहे.
राजू शेट्टी हे आज ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हणाले की, “मी आमदारकीच्या आशेवर बसलो नाही, नाही मिळाली तरी फरक पडत नाही. महाविकास आघाडीने सर्वच पातळीवर निराशा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. येत्या ५ तारखेच्या बैठकीत कठोर निर्णय घेतला जाईल.”
“विधानपरिषदेत स्वाभिमानी संघटनेला एक जागा द्यायची असा शब्द दिला होता. हा शब्द पाळायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. कार्यकारिणीचा निर्णय झाल्यानंतर माझा वैयक्तिक निर्णय काय होईल ते कळेल,” असेही राजू शेट्टी म्हणाले.
“महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय हा सामुदायिक होता. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारला समीक्षा करण्याची वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडी तयार झाली, त्याचं काय झालं? अनेक मुद्दे खटकणारे आहेत. नवीन धोरण राबवताना संवादही साधला नाही,” अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली.
हे ही वाचा:
शिवसेनेचे सभासद कार्ड, पैसे उकळले मनसेच्या नावाने?
चिदंबरम म्हणाले, मी प्रियांका गांधींना आधीच सांगितले होते, पण…
‘पावनखिंड’ लवकरच ओटीटी प्लॅटफोर्मवर
‘या’ देशाला दिली भारताने १ अब्ज डॉलरची मदत
भाजपच्या काळातील सगळ्याच योजना नाव ठेवण्यासारख्या नव्हत्या, असे राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमध्ये राहिली काय किंवा नाही राहिली काय? सरकारला काही फरक पडत नाही, असा खोचक टोला राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारला लगावला.