अंधेरीच्या ईएसआयसी रुग्णालयातील डॉक्टरांच्या बदलीमुळे रुग्णांचे हाल

माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी व्यक्त केला संताप

अंधेरीच्या ईएसआयसी रुग्णालयातील डॉक्टरांच्या बदलीमुळे रुग्णांचे हाल

अंधेरी येथील ईएसआयसी रुग्णालयातील डॉक्टरांची सरसकट बदली केल्यामुळे सध्या रुग्णांच्या हालात भर पडली आहे. मुंबईचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस नेते राजेश शर्मा यांनी या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे आणि या सगळ्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.

 

राजेश शर्मा यांनी म्हटले आहे की, ईएसआयसी रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवा तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे. गेली चार साडेचार वर्षे हे रुग्णालय बंद होते. २०१८मध्ये झालेल्या आगीच्या घटनेनंतर हे रुग्णालय वापरात नव्हते. जेव्हा ते सुरू झाले तेव्हा तिथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील अशी अपेक्षा होती. पण हे अत्यंत दुर्दैवी आहे की, आयपीडी सेवा, सीटी स्कॅन, एमआरआय, रक्तपेढी, शस्त्रक्रिया विभाग अद्याप बंदच आहे. रक्तचाचणी विभाग, एक्सरे, यूएसजी हे विभाग अगदी मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा तिथे नाही. या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना इतर रुग्णालयात पाठवले जाते ती प्रक्रिया वेळखाऊ असते. त्या रुग्णालयात रुग्णांना संपूर्ण दिवस घालवावा लागतो किंवा काहीवेळा त्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा रुग्णालयात यावे लागते.

हे ही वाचा:

अग्निवीर तरुणीची आत्महत्या!

शब्द मागे घेऊन, विषय संपेल का?

पप्पू अखेर २४व्या प्रयत्नांत पास!

केरळमधील अपहरण झालेल्या ६ वर्षीय मुलीची अखेर सुटका!

ही सगळी परिस्थिती कमी की काय म्हणून आता ईएसआयसी मुख्यालयाने डॉक्टरांच्या सरसकट बदलीचा निर्णय घेतला आहे. इथे असलेले तज्ज्ञ डॉक्टर अन्यत्र बदली केले जात असल्यामुळे रुग्णांच्या उपचारावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. बदली केल्यानंतर त्याजागी कुणालाही घेण्यात आलेले नाही.

 

शर्मा म्हणतात की, ही परिस्थिती पाहता हे रुग्णालय बंद करण्याचा घाट घातला जात आहे. हे रुग्णालय सरकारला झुकते माप देणाऱ्या श्रीमंतांच्या ताब्यात देण्याची योजना आहे. सध्या हे रुग्णालयच व्हेन्टिलेटरवर आहे. कोणत्याही क्षणी त्याची सगळी यंत्रणा कोसळू शकते.

Exit mobile version