कोल्हापूर उत्तर मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत आपल्याऐवजी काँग्रेसला जागा दिल्यामुळे तेथील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर चांगलेच वैतागले आहेत.
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघात ही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. पण त्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेससाठी जागा सोडल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर शिवसेनेतील नाराजी प्रकर्षाने पुढे आली आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले राजेश क्षीरसागर शुक्रवारपासून नॉट रिचेबल होते पण अखेर त्यांनी रविवारी सभा घेत शक्तीप्रदर्शन केले आणि हा निर्णय पटला नसल्याचे रोखठोक मत व्यक्त केले.
क्षीरसागर शेकडो शिवसैनिकांना संबोधित करताना म्हणाले की, महाविकास आघाडीची स्थापना होत असताना ज्या पक्षाच्या आमदाराचे निधन होईल त्याच पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी तिन्ही पक्ष असतील हा निर्णय होता. २०१९च्या निवडणुकीत माझा पराभव झाला. पण निवडणुकीतल्या पराभवाने मी डगमगलो नाही. जनतेच्या कार्यासाठी झटू लागलो. पूरस्थिती, करोना समाजहिताची कामे केली. विकासाचीही कामे केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठआकरे, एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने २३७ कोटी मंजूर करून घएतले. रंकाळ्यासाठी पैसे आणले. मूलभूत सुविधा आणल्या. तालिम संस्था बांधल्या. या पोटनिवडणुकीत मीच शिवसेनेतर्फे निवडणूक लढवावी, असा निर्णय घेतला होता. एक्झिट पोल पाहिल्यावर शिवसेनेचा विजय निश्चित होता. इथे खरोखरच तिरंगी लढत व्हायला पाहिजे होती, मग काँग्रेसला शिवसेनेची ताकद कळली असती.
हे ही वाचा:
काश्मिरी पंडितांच्या अवस्थेला पाकिस्तानसह दहशतवाद जबाबदार
‘एमआयएमची आहे हार्डलाईन, त्यामुळे….’ रामदास आठवलेंची त्यांच्या शैलीत प्रतिक्रिया
‘जिथे अखिलेश, तिथे निर्माण होतो क्लेश’
आर आर आर चित्रपटाची टीम पोहोचली स्टॅच्यू ऑफ युनिटीला
क्षीरसागर यांनी सांगितले की, कोल्हापूर उत्तरची निवडणूक जाहीर केली आणि आपण १३ मार्चला मेळावा घेतला. सर्वांनी एकमत मांडले होते शिवसेनेने निवडणूक लढवावी. भाजपाशी संबंध ठेवायचे नाही असे ठरले असताना जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीने भाजपाशी युती केली आणि शिवसेनेला का अडवले याचे उत्तर द्यावे. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्य़ाला यायला हवा असे सांगायला हवे होते, पण तसे घडले नाही हे दुर्दैव. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या शिवसेनेचे पाच आमदार ज्या काँग्रेसने पाडले, त्यांच्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय दुःखदायक आहे.