राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांना राजकीय पटलावर टक्कर देणारे आणि एकेकाळचे त्यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळख असणारे राजेंद्रसिंह गुढा यांनी शनिवार, ९ सप्टेंबर रोजी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानला गेले असून त्यांच्या उपस्थितीत गुढा यांनी पक्ष प्रवेश केला.
राजेंद्रसिंह गुढा यांनी मंत्री असताना जुलैमध्ये विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. विधानसभेत काँग्रेस आमदारांनी मणिपूर हिंसाचार आणि मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्द्यावर बोलताना राजेंद्रसिंह गुढा यांनी काँग्रेसला आठवण करून दिली होती की, बलात्काराच्या बाबतीत राजस्थान प्रथम क्रमांकावर आहे. मणिपूरबद्दल बोलण्यापूर्वी आपण स्वतःच्या घरात डोकावलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी सरकारवरच ताशेरे ओढले होते. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी गुढा यांना बडतर्फ करण्यात आले होते.
त्यानंतर राजस्थानच्या राजकारणात एका लाल डायरीची चर्चा होती. या लाल डायरीत राजस्थान सरकारच्या कथित भ्रष्टाचाराचा संपूर्ण तपशील असल्याची माहिती आहे . केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावरून गेलहोत यांच्यावर टीका केली होती. ही लाल डायरी गुढा यांच्याच ताब्यात आहे.
हे ही वाचा:
जी-२० मध्ये पंतप्रधान मोदींकडून ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’चा मंत्र
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सीआयडीकडून अटक
पाठीशी तीन भावंडे असलेला ‘गोविंदा’ झाला गंभीर जखमी, अर्धांगवायूने पीडित
आरटीडीसीचे अध्यक्ष धर्मेंद्र सिंह राठोड यांच्या घरावर पडलेल्या इनकम टॅक्सच्या छाप्यांपूर्वी ही लाल डायरी आणण्यात आली होती, असा दावा राजेंद्र गुढा यांनी विधानसभेत केला होता. त्या दिवशी राजस्थानच्या विधानसभेत मोठा गदारोळ झाला होता. गुढा यांनी लाल डायरीची तीन पानंही प्रसिद्ध केली होती, ज्यात आरसीए निवडणुकीतील व्यवहारांचा उल्लेख होता.