खोडसाळ राजदीप सरदेसाईंना धक्का

खोडसाळ राजदीप सरदेसाईंना धक्का

जेष्ठ पत्रकार आणि ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीचे निवेदक राजदीप सरदेसाई यांच्यावर ‘इंडिया टुडे’ समूहाने कारवाई केली आहे. २६ जानेवारी रोजी दिल्ली हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे धडधडीत खोटे वार्तांकन केले होते. याच प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राजदीप यांची पत्रकारिता कायमच वादग्रस्त राहिली असून या आधीही त्यांनी खोटे वार्तांकन केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण २६ जानेवारीचे हे प्रकरण राजदीप यांच्यावर चांगलेच शेकणार असे दिसत आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसेचा वणवा भडकला असताना राजदीप सरदेसाई हे ‘इंडिया टुडे’ वाहिनीसाठी वार्तांकन करित होते. राजदीप यांनी त्यांच्या वैय्यक्तिक ट्विटर खात्यावरून एका मृत व्यक्तीचा फोटो ट्विट करत नवनीत असे नाव असणाऱ्या त्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू पोलीस गोळीबारात झाल्याचे सांगितले. पण वास्तविक तसे काही घडले नव्हते. पोलिसांनी गोळीबार केलाच नव्हता. एका संवेदनशील विषायत अशा बेजबाबदारपणे वार्तांकन करण्यासाठी सरदेसाई यांच्यावर वाहिनीने कारवाई केली आहे. राजदीप यांना दोन आठवड्यांसाठी निलंबीत करण्यात आले असून त्यांचा एक महिन्याचा पगार कापण्यात आला आहे.

सोशल मीडियावर मात्र या संदर्भात निरनिराळ्या चर्चा रंगल्या असून राजदीप सरदेसाई यांनी ‘इंडिया टुडे’ वाहिनी सोडल्याच्या बातम्या येत आहेत. ‘मेघ अपडेट्स’ नावाच्या एका ट्विटर हँडलने राजदीप सरदेसाई यांनी वाहिनी सोडल्याची बातमी दिली आहे. पण यामुळे राजदीप सरदेसाई यांनी वाहिनी सोडली? की त्यांची हकालपट्टी करत त्यांना वाहिनी सोडण्यास भाग पाडले गेले? या चर्चांना उधाण आले आहे.

Exit mobile version